Corona Virus Effect : “तिने ” चीनमध्ये शिकतेय असे सांगितले आणि डॉक्टरांनी केले पलायन, विशेष पथकाने केली घरी जाऊन तपासणी !!

देशात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत चालल्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. उत्तर प्रदेशात तर कोरोनाच्या भीतीचं धक्कादायक असंच प्रकरण समोर आलं आहे. चीनमधून परतलेल्या विद्यार्थीनीला पाहताच डॉक्टर खुर्ची सोडून पळून गेल्याचा प्रकार घडला असल्याचे वृत्त आहे.
याविषयीची अधिक माहिती अशी कि , तीन फेब्रुवारीला एक विद्यार्थीनी चीनमधून परतली होती. तेव्हापासून तिला २८ दिवसांसाठी देखरेखीखाली ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर सर्दी आणि खोकल्याच्या उपचारासाठी ती जिल्हा सरकारी रुग्णालयात गेली होती. तेव्हा तिने डॉक्टरांना सांगितलं की, ती चीनमध्ये एमबीबीएसचं शिक्षण घेत आहे. हे ऐकताच डॉक्टर तिथून पळून गेले. हे धक्कादायक होतं. रुग्णालयातील इतर कर्मचाऱ्यांनी याची माहिती रॅपिड रिस्पॉन्स टीमला दिली. त्यानंतर पथकाने घरी जाऊन विद्यार्थीनीची तपासणी केली. या चाचणीत कोरोना व्हायरसची कोणतीच लक्षणे नसल्याचं समोर आल्यानंतर सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला.
बुडण्यात कर्फ्यूसदृश परिस्थिती, सर्वत्र शुकशुकाट , त्या मयत रुग्णाला कोरोना नसल्याचा अहवाल
बुलडाण्यात सौदी अरेबियातून आलेल्या रुग्णाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्यानंतर त्या व्यक्तीला करोना व्हायरस नसल्याचा अहवाल आला असला तरी बुलडाणा शहरात सर्वत्र शुकशुकाट दिसत असून कर्फ्यूसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. करोनामुळेच रुग्णाचा मृत्यू झाला असल्याची अफवा शहरात पसरल्यामुळे दहशत निर्माण झाली आहे. कोरोच्या भीतीमुळे आज आठवडी बाजारात शुकशुकाट आहे . दरम्यानच्या काळात लोकांनी प्रवास करणेही टाळल्याने बसस्थानकही ओस पडले आहे.
ज्या रुग्णाचा मृत्यू झाला त्या रुग्णाला सर्दी व तापाची लक्षणे असल्याने कोरोनाच्या संशयावरून बुलडाणा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन कक्षात शनिवारी दाखल करण्यात आले होते. शुक्रवारी हा संशयित रुग्ण सौदी अरेबियातून आला होता. त्यांची मुंबई विमानतळावर तपासणीही करण्यात आली होती. मात्र, त्यांची प्रकृती चांगली वाटल्याने त्यांना त्यांच्या मूळगावी जाण्याची परवानगी देण्यात आली होती. दरम्यान, घरी आल्यावर त्याला सर्दी, ताप आला. त्यामुळे तो खासगी रुग्णालयात गेला परंतु जोखीम नको म्हणून डॉक्टरांनी त्याची रवानगी जिल्हा सामान्य रुग्णालयात केली. संबंधित रुग्णाचे रक्ताचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. मात्र, रिपोर्ट येण्यापूर्वीच रुग्णाचा मृत्यू झाला. त्यामुळे खळबळ उडाली होती. यासंबधी आज अधिकृत रिपोर्ट आला असून त्यात त्याला कोरोनाची लागण झाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. कला रात्रीच या व्यक्तिवर अंत्यसंस्कार करण्यात आल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडीत यांनी सांगितले.
दरम्यान, बुलडाण्यात विदेशातून १२ जण पाहुणे म्हणून आलेले असून त्यांच्यावर प्रशासन लक्ष ठेवून आहे. यातील तीन जणांना खामगाव येथील उपचार कक्षात ठेवण्यात आले असून ९ जणांवर देखरेख करण्यात येत असल्याचं पंडित यांनी सांगितलं. या पाहुण्यांना चौदा दिवस निगराणी खाली ठेवण्यात येणार असून कोरोनाचे गांभीर्य पाहता सर्वोतोपरी खबरदारी आरोग्य विभागाकडून ठेवण्यात आली असल्याचे पंडित म्हणाले. यामध्ये सात जण इंडोनेशिया आणि पाच जण मलेशिया येथून आले आहेत.