येस बँकेसारख्या आणखी पाच बँका बुडण्याच्या मार्गावर : प्रकाश आंबेडकर

येस बँकेसारख्या आणखी पाच बँका बुडण्याच्या मार्गावर आहेत. देशाची आर्थिक परिस्थिती डबघाईला आली आहे. सध्याचे केंद्र सरकार कारभार चालवण्याच्या लायकीचे नाही. आपले पितळ उघडे पडू नये म्हणून केंद्र सरकार एप्रिल-मे महिन्यात देशात अराजकता माजवण्याचा प्रयत्न करणार आहे, असा गंभीर आरोप आंबेडकर यांनी केला. देशाची राजधानी दिल्लीतील दंगलीवरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निशाणा साधणाऱ्या वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आता केंद्रातील मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. सध्याचे केंद्रातील भाजप सरकार हे कारभार चालवण्याच्या लायकीचे नाही, असा घणाघात त्यांनी केला.
सीएए कायद्याविरोधात दिल्लीतील आंदोलनाला दंगलीचं स्वरुप प्राप्त झालं. दिल्लीची दंगल ही पूर्वनियोजित होती. या दंगलीमागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे, असा खळबळजनक आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला होता. त्यानंतर आता केंद्रातील मोदी सरकारवर त्यांनी टीका केली आहे. आंबेडकर यांनी राज्याच्या अर्थसंकल्पावरही टीका केली होती. अर्थसंकल्पात ८ हजार कोटींची तूट दाखवण्यात आली आहे. प्रत्यक्षात मात्र ही तूट १६ हजार कोटींची आहे. राज्याने दाखवलेली ८ हजार कोटींची तूट आणि केंद्राकडून मिळणारे ८ हजार कोटी अशी १६ हजार कोटी रुपयांची प्रत्यक्ष तूट असल्याचं आंबेडकर म्हणाले होते. सत्तेसाठी राज्यातील काँग्रेस आघाडीची शिवसेनेमागे फरफट सुरू असल्याचा टोलाही त्यांनी लगावला होता.