केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंददायी बातमी

केंद्र सरकारचे कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यात ४ टक्क्यांची वाढ करण्याच्या प्रस्तावाला आज केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील मंत्रिमंडळाच्या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्क्यांची वाढ करत तो २१ टक्के इतका करण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाचा फायदा ३८ लाख कर्मचारी आणि ६५ लाख पेन्शनर्सना होणार आहे. मात्र, यात लष्कर आणि सुरक्षादलातील कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आलेला नाही. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे केंद्र सरकारवर १४ हजार ५९५ कोटी रुपयांचा भार पडणार आहे. मार्च महिन्याच्या पगारासोबतच केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना महागाई भत्ता मिळणार आहे, अशी माहिती केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुरागसिंह ठाकूर यांनी राज्यसभेत दिली.
आतापर्यंत केंद्र सरकारी कमर्चाऱ्यांना १७ टक्के महागाई भत्ता दिला जात होता. तो आता २१ टक्के करण्यात आला आहे. यामुळे निवृत्तीवेतनधारकांना (पेन्शनर्स) यांना देखील फायदा होणार आहे. १ जानेवारीपासूनचा वाढीव महागाई भत्ता आणि त्याचा फरक मार्च महिन्याच्या वेतनात अदा केला जाईल, असे सरकारने म्हटलं आहे. जानेवारी २०१६ मध्ये मोदी सरकारने केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सातवा वेतन आयोग लागू केला होता. त्यावेळी कमर्चाऱ्यांच्या वेतनात भरघोस वाढ झाली होती. आता महागाई भत्ता वाढवल्याने कर्मचाऱ्यांना फायदा होईल, असे जावडेकर यांनी सांगितले.