Corona Virus Effect : कोणाचे काय तर कोणाचे काय ? या महाराजांनी आयोजित केली “गो-मूत्र ” पार्टी !!

कोरोनाच्या निमित्ताने जगातील सर्व वैद्यानिक कोरोना व्हायरसवर इलाज करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत असताना भारतात मात्र अनेक महाभाग कोरोनावर अनेक गावठी इलाज सांगून लोकांची दिशाभूल करताना दिसत आहेत आणि विशेष म्हणजे सरकार त्यांना थांबविण्यासाठी कोणतीही उपाययोजना करायला तयार नाही. या पार्श्वभूमीवर एकीकडे संपूर्ण जगात करोना हा जागतिक साथीचा आजार घोषित करण्यात आला असताना, दुसरीकडे अखिल भारतीय हिंदू महासभेने करोनावर उपाय म्हणून गोमूत्र रामबाण उपचार असल्याचा दावा केला आहे. यासाठी हिंदू महासभा शनिवारी देशातील अनेक राज्यांमध्ये गोमूत्र पार्टीचे आयोजन करत आहे. हिंदू महासभेच्या दिल्ली कार्यालयात होणाऱ्या गोमूत्र पार्टीत अखिल भारतीय हिंदू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वामी चक्रपाणी उपस्थित राहणार आहेत. या पार्टीत सहभागी होणाऱ्या लोकांना करोनापासून वाचण्यासाठी मांसाहार सोडून गोमूत्र सेवन करण्याचा सल्ला देण्यात येणार आहे.
चक्रपाणी यांनी केलेल्या दाव्यानुसार गोमूत्र हा एकमेव असा पदार्थ आहे, ज्यामध्ये ३२ तत्व असतात. या तत्वांमुळे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते. आमच्या शास्त्रांमध्येही याचे महत्त्वा सांगण्यात आले आहे. जो व्यक्ती गोमूत्र प्राशन करेल, अशा व्यक्तीला गोमूत्राचा धोका नाही. दरम्यान तुम्ही जो दावा करत आहात ते वैज्ञानिक आधारावर सिद्ध झालेले नाही. असे असताना तुम्हा आयोजित करत असलेल्या गोमूत्र पार्टीचे काय औचित्य आहे, असा प्रश्न चक्रपाणी यांना पत्रकारांनी विचारला. त्यावर उत्तर देताना चक्रपाणी म्हणाले की, ‘विज्ञानाला बऱ्याच गोष्टी मान्य नाहीत. मात्र आम्ही आध्यात्माच्या आधारावर चालतो. आतापर्यं ज्या लोकांना करोनाची लागण झाली आहे, असे सर्व लोक मांसाहारी आहेत. चीनमधील लोक पाल, साप असे सर्व जीवजंतू खातात म्हणूनच चीनमध्ये करोना फोफावला.’ गोमूत्र पार्टीत सहभागी होणाऱ्या लोकांना आम्ही गो-पंचगव्यासोबत गोमूत्र सेवन करण्यासाठी देणार असल्याचे चक्रपाणी म्हणाले. आम्ही लोकांना मांसाहारापासून दूर राहण्याची, तसेच जीवहत्या न करण्याची शपथ देणार आहोत, असेही चक्रपाणी म्हणाले. देशात अनेक ठिकाणी आम्ही गोमूत्र पार्टीनंतर हवन-भजनाच्या कार्यक्रमांचे आयोजन करणार असल्याचेही ते म्हणाले.