“चला हवा येऊ द्या” च्या टिमवर खा. संभाजी राजे यांनी दिली “हि” संतप्त प्रतिक्रिया…

राजर्षी शाहू महाराज आणि सयाजीराव गायकवाड यांचा फोटो मॉर्फ करून या मालिकेतील अभिनेत्यांच्या रुपात वापरण्याल्याने ‘झी मराठी’ या वाहिनीवर सुरू असलेला ‘चला हवा येऊ द्या’ हा विनोदी कार्यक्रमक वादात सापडला असून राज्यातील फुले, शाहू आंबेडकरवादी तरुणांनी या मालिकेच्या टीमवर टीकास्त्र सोडले आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती यांनीही यावरून आपली तीव्र प्रतिक्रिया दिली असून या कार्यक्रमाचे संयोजक डॉ. निलेश साबळे आणि झी टीव्ही ने माफी मागावी अशी मागणी केली आहे.
यावरून फेसबुकवर दिलेल्या प्रतिक्रियेत संभाजीराजे यांनी म्हटले आहे कि , ‘लोकप्रियतेची हवा डोक्यात घुसली, की माणूस विक्षिप्त वागायला सुरू करतो. ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमात राजर्षी शाहू महाराज आणि सयाजीराव गायकवाड यांच्या प्रतिमेचा चुकीच्या पद्ध्तीने वापर केला गेला आहे. हे आक्षेपार्ह तर आहेच, परंतु निषेधार्ह सुद्धा आहे. निलेश साबळे तसेच झी वाहिनी ने या गैरकृत्याची जबाबदारी घेऊन जाहीर माफी मागावी. अन्यथा वाहिनी व दिग्दर्शक यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. आमचे घराणे हे कलेचे आश्रयदाते आहे. स्वतः शाहू महाराजांनी कोल्हापूरला कलानगरीमध्ये रूपांतरित केले होते. सयाजीराव गायकवाडांचे योगदानही काही कमी नाही. कलेसाठी स्वातंत्र्याची आणि पोषक वातावरणाची गरज असते. परंतु याचा अर्थ असा नाही की आपण काहीही करावं. आम्हा सर्व इतिहास प्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत,’ अशा शब्दांमध्ये संभाजीराजे यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.
https://www.facebook.com/YuvrajSambhajiraje/posts/1509073462584201
दरम्यान या फोटोमुळे ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमावर आणि झी मराठी वाहिनीवर नेटकरीही संतापले असून ते सोशल मीडियातून आपला संताप व्यक्त करत माफी मागण्याची मागणी करत आहेत. ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रामात राजर्षी शाहू महाराज आणि सयाजीराजे गायकवाड यांच्या प्रतिमांचा चूकीच्या पद्धतीनं वापर केल्याचा आरोप शाहूप्रेमींनी केला आहे.
झी टीव्हीवर ११ मार्च २०२० रोजी प्रसारित झालेल्या कार्यक्रमात राजर्षी शाहू महाराज आणि सयाजीराजे गायकवाड यांच्या प्रतिमांचा चूकीच्या पद्धतीनं वापर करण्यात आला. या दिवशाच्या खास कार्यक्रमात सुबोध भावे आणि दिग्दर्शक सुभाष घई यांनी ‘विजेता’चित्रपटाच्या प्रमोशनसाठी उपस्थिती लावली होती. यात छत्रपती शाहू महाराज आणि सयाजीराजे गायकवाड यांच्या प्रतिमेत भाऊ कदम आणि कुशल बद्रिके यांचा फोटो लावण्यात आला होता. त्यामुळं या प्रकारावर शाहुप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे. दरम्यान हा भाग प्रसारित झाल्यानंतर ‘चला हवा येऊ द्या’ टीमवर नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर टीका केली आहे. त्या एपिसोडवर आक्षेप घेत हा छत्रपती शाहू महाराजांचा अपमान असल्याचं नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. या प्रकरणी खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी देखील निलेश साबळेवर निशाणा साधत जाहीर माफी मागण्याची मागणी केली आहे.