Breaking News : Aurangabad महापालिका निवडणूक लांबणीवर …. ?

महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे कामकाज राज्यातील कोरोना व्हायरसच्या संकटामुळे २० तारखेऐवजी उद्या शनिवारी संपत असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या आरोग्य यंत्रणेला दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. दरम्यान आज औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या विषयावर चर्चा होत असताना हि निवडणूक सहा महिने पुढे ढकलण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विचार करीत असल्याचे खात्रीलायक वृत्त असून निवडणूक वेळेवर होणार कि पुढे जाणार याचा उद्याच हा निर्णय अपेक्षित आहे. न्यायालयानेही महापालिका निवडणुकीशी संबंधित निकाल राखून ठेवला आहे . त्यामुळे शासन आणि न्यायालय यावर काय निर्णय घेणार याकडे औरंगाबादकरांचे लक्ष लागलेले आहे . या बाबतीत शासनस्तरावर कायदेशीर सल्ला जात असून औरंगाबादचे महापौर नंदकुमार घोडेले आणि खा. इम्तियाज जलील यांनीही या पूर्वीच निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी केली आहे तर मनसेने मात्र निवडणूक लांबणीवर न टाकता वेळेवर निवडणूक घेण्याची मागणी केली आहे.
येत्या एप्रिल महिन्यात निवडणूक होऊ घातल्याने प्रशासनानेही निवडणुकांच्या दृष्टीने तयारी केली आहे. निवडणुकीसाठी प्रारूप मतदार याद्याही नागरिकांसाठी प्रसिद्ध केल्या आहेत. दरम्यान वार्ड रचना आणि वॉर्डांचे आरक्षण या विषयावरून काही कार्यकर्ते उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठातही गेले आहेत. न्यायालयाने तूर्त हा निकाल राखून ठेवला आहे. दरम्यान या प्रकरणात आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडूनच निर्णय घेण्याची शक्यता आहे. महानायक ऑनलाईन ला मिळालेल्या खात्रीलायक माहितीनुसार औरंगाबाद महापालिका निवडणूक पुढे ढकलण्याआधी आवश्यक त्या कायदेशीर बाबी तपासून यासंबंधी निर्णय घेतला जात आहे.
सध्या सर्वच पक्षांनी औरंगाबाद महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कंबर कसली असून शिवसेना , काँग्रेस , राष्ट्रवादी , भाजप , मनसे सहित एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीनेही निवणुकांची तयारी चालविली आहे. सर्वच पक्षाच्या इच्छुक उमेदवारांनी आपली तिकिटे निश्चित करण्यासाठी आपापल्या मार्गाने फिल्डिंग लावली आहे मात्र आता सरकारने हि निवडणूक पुढे ढकलण्याचे मन बनविल्याने या सर्व प्रयत्नांवर पाणी पडेल असे चित्र आहे. दरम्यान औरंगाबाद निवडणुकीवर लक्ष ठेवून मनसे नेते राज ठाकरे यांनीही नुकताच शिवजयंतीच्या निमित्ताने आपला दौरा केला आहे. तर भाजपनेही शिवसेनेला शह देण्यासाठी जय्यत तयारी केली आहे. आपल्या औरंगाबाद दौऱ्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी याच कारणावरून औरंगाबादच्या नामांतराचा कळीचा मुद्दा उपस्थित करताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद विमानतळाला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव देऊन भाजपवर कुरघोडी केली आहे.