महाराष्ट्र राज्यसभा : प्रियांका चतुर्वेदी यांच्या उमेदवारीवर चंद्रकांत खैरे यांनी दिली ” हि” प्रतिक्रिया…

शिवसेनेच्या वतीने काँग्रेसमधून आलेल्या प्रियंका चतुर्वेदी यांना शिवसेनेतर्फे राज्यसभेची उमेदवारी दिल्यानंतर माजी खासदार आणि सेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. एका वृत्त वाहिनीशी बोलताना खैरे म्हणाले कि , “प्रियंका चतुर्वेदी यांचे काम दिसले मात्र आमचे काम दिसले नाही , मात्र आपण कट्टर शिवसैनिक असून स्मशानात जाईपर्यंत मी शिवसेनेत असणार आहे. मी बाळासाहेब ठाकरेंसोबत काम केलं. आता उद्धव ठाकरेंसोबत काम करतो आहे. त्यांना वाटतं की नवीन लोकांना संधी दिली पाहिजे. मी याआधी चारवेळा खासदार झालो आहे. मात्र माझ्या मराठवाड्यातील लोकांना अपक्षा होती. मी एक कडवट शिवसैनिक आहे. जनतेची सेवा करत आलो आहे. यापुढेही करेन असेही चंद्रकांत खैरे यांनी म्हटलं आहे.
“प्रियंका चतुर्वेदी चांगलं काम करत आहेत. हिंदी बोलतात, इंग्रजीही बोलतात. मी २० वर्षे लोकसभा गाजवली. मला आवश्यकता नव्हती पण माझ्या शहराला खासदारकीची आवश्यकता होती. मला अनेक ऑफर होत्या पण इकडे-तिकडे गेलो नाही.” असंही चंद्रकांत खैरे यांनी म्हटलं आहे .मला संधी मिळाली असती तर पक्षासाठी आणखी चांगले काम करता आले असते असंही चंद्रकांत खैरे यांनी म्हटलं आहे. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. ते पुढे म्हणाले कि , “आदित्य ठाकरेंना प्रियंका चतुर्वेदी यांचे काम आवडले असेल. त्यामुळे त्यांनी उमेदवारी दिली असेल आम्ही देखील मराठवाड्यासाठी खूप काम केलं. पण आमचे काम त्यांना दिसत नाही. प्रियंका चतुर्वेदी नक्कीच चांगलं काम करतील.” तुमची नाराजी तुम्ही पक्षप्रमुखांना सांगणार का? असं विचारलं असता ते म्हणाले, ” मी स्वतःहून त्यांच्याकडे जाणार नाही. मात्र त्यांनी बोलावले तर नक्की जाणार.”