दिल्लीतील दंगलीवर पहिल्यांदाच बोलले गृहमंत्री अमित शहा

दिल्लीत सीएएवरून जवळपास चार दिवस चालेल्या दंगलीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज पहिल्यांदा स्पष्टीकरण दिलं. ईशान्य दिल्लीत उसळलेल्या दंगलीवेळी आपण दिल्लीतच होते आणि दिल्ली पोलिसासोबत दंगल नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न करत होतो, असं शहा म्हणाले. आपण अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत होतो , हा विरोधकांचा आरोप त्यांनी खोडून काढला.
अमित शहा म्हणाले कि , आपण दिल्लीतील दंगलीचा सतत आढावा घेत होतो. २४ फेब्रुवारीला संध्याकाळी ७ वाजता, २५ ला सकाळी ८ वाजता आणि २५ ला संध्याकाळी ६ वाजता बैठका घेऊन दिल्लीतील परिस्थितीचा आपण आढावा घेतला. दंगल होते त्यावेळी कुणाची काय जबाबदारी आहे हे बघून काम केलं जात नाही. मीच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांना ईशान्य दिल्लीतील दंगलग्रस्त भागाला भेट देण्यास सांगितलं होतं. तसंच दिल्ली पोलिसांचं मनोधैर्य वाढवा असं त्यांना बोललो होतो. दंगलग्रस्त भागात पाहणीसाठी मीही जाऊ शकलो असतो. पण याने पोलिसांचं लक्ष माझ्याकडे वेधलं गेलं असतं. यामुळे मी गेलो नाही. पण पोलिसांनी ३६ तासांत दंगल नियंत्रणात आणली. या दंगलीसाठी ३०० जण यूपीतून दिल्लीत आले होते, अशी माहिती शहांनी दिली. दिल्ली पोलिसांनी ३६ तासांमध्ये दंगलीवर नियंत्रण मिळवलं. या दंगलीत ५० हून अधिक जणांचा मृत्यू झाला. हजारो कोटींच्या मालमत्तेचं नुकसान झालं. यामुळे दिल्लीतील दंगलीच्या दोषींना सोडणार नाही. संपूर्ण आधुनिक पद्धतीने दंगलीचा तपास केला असल्याचंही अमित शहा म्हणाले.