Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Maharashtra Rajya Sabha : भाजपकडून तिसऱ्या जागेसाठी डॉ. भागवत कऱ्हाड यांना संधी , रामदास आठवले , उदयन राजे यांचे अर्ज दाखल

Spread the love

औरंगाबादमधून शिवसेनेतर्फे माजी खासदार चंद्रकांत खैरे  यांना राज्यसभेची उमेदवारी मिळाली नसली तरी भाजपकडून मात्र चर्चेत नसतानाही महाराष्ट्रातून राज्यसभेसाठी भाजपचा  तिसऱ्या उमेदवाराच्या म्हणून  डॉ. भगवत कराड यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या तिसऱ्या नावासाठी पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, हंसराज अहिर, विजया रहाटकर यांच्यासह अनेक नावं चर्चेत होती. परंतु डॉ. भगवत कराड यांना हि संधी देण्यात आल्याने औरंगाबादेतील भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. भाजपने विविध राज्यांमधील पाच उमेदवारांच्या नावाचं प्रसिद्धपत्रक जारी करून हि माहिती दिली आहे. यामध्ये महाराष्ट्रातून डॉ.भागवत कराड यांचा समावेश आहे. याशिवाय अमरीश पटेल यांना विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. डॉ. भगवत कराड हे औरंगाबादचे माजी महापौर आहेत.

दरम्यान राज्यसभेसाठी भाजपकडून उमेदवारी मिळालेले रामदास आठवले व उदयनराजे भोसले यांनी आज विधानभवनात आपला अर्ज दाखल केला. आठवले हे भाजप आघाडीतील घटक पक्षाचे नेते व विद्यमान केंद्रीय राज्यमंत्री असल्यानं त्यांना उमेदवारी मिळणं निश्चित होतं. राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपमध्ये आलेले उदयनराजे यांचा लोकसभेच्या पोटनिवडणुकीत पराभव झाला होता. मात्र, खासदारकीवर पाणी सोडून त्यांनी भाजपला जवळ केलेलं असल्यानं त्यांचीही उमेदवारी पक्की होती. त्यानुसार त्यांना ती जाहीर झाली.

भाजपच्या केंद्रीय संसदीय समितीकडून राज्यसभेची पहिली यादी बुधवारी  जाहीर करण्यात आली. यामध्ये महाराष्ट्रातून रामदास आठवले आणि उदयनराजे भोसले यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. मात्र तिसऱ्या जागावर कोणाला संधी मिळणार याबाबत सस्पेन्स होता. परंतु भाजपने खडसे, अहिर, रहाटकर यांचा डावलून डॉ. भागवत कराड यांना उमेदवारी दिली. दरम्यान, एकनाथ खडसेंची राज्यसभेवर वर्णी लागावी, यासाठी राज्यातील भाजप नेत्यांचे प्रयत्न सुरु होते. पण त्याचा परिणाम झालेला दिसत नाही. दरम्यान आपण या तिकिटासाठी इच्छुक नव्हतो अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली आहे.

राज्यसभेवर महाराष्ट्राच्या कोट्यातून निवडून द्यावयाच्या सात जागांसाठी येत्या २६ मार्च रोजी निवडणूक होत आहे. संख्याबळाच्या आधारावर भाजपकडून या निवडणुकीत तीन उमेदवार उतरवण्यात आले आहेत. त्यापैकी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले व साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांना आधीच उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. तिसऱ्या उमेदवारावर भाजपमध्ये बराच खल सुरू होता. भागवत कराड हे सध्या प्रदेश भाजपचे चिटणीस आहेत. वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्याची पार्श्वभूमी असलेल्या कराड यांना गोपीनाथ मुंडे यांनी भाजपमध्ये आणले होते. तेव्हापासून ते भाजपमध्ये कार्यरत आहेत.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!