मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सहकुटुंब रामलल्लाच्या दर्शनासाठी अयोध्येत दाखल

महाविकास आघाडीला १०० दिवस पूर्ण झाल्याच्या निमित्ताने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सहकुटूंब रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी अयोध्येत दाखल झाले आहेत. दोन महिन्यांपूर्वीच खासदार संजय राऊत यांनी या दौऱ्याची घोषणा केली होती. या आधीही दोन वेळा ठाकरे हे अयोध्येत गेले होतो. लोकसभा निवडणुकीच्या आधी आणि विधानसभा निवडणुकीच्या आधी त्यांनी अयोध्येत जाऊन दर्शन घेतलं होतं. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर परिस्थिती बदलली आणि शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने सरकार स्थापन केल्यानंतर आज तिसऱ्यांदा उद्धव ठाकरे अयोध्येत पोहोचले आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येत दाखल होण्यापूर्वीच इथं मोठ्या प्रमाणात शिवसैनिक दाखल होत आहेत. शिवसैनिकांना घेऊन एक विशेष रेल्वे मुंबईहून अयोध्येला दाखल होत आहे. तसंच उत्तर प्रदेशच्या अनेक जिल्ह्यांतूनही शिवसैनिक अयोध्येत पोहचत आहेत.
दरम्यान आज होणाऱ्या शिवसेनेच्या दौऱ्यावर मात्र, कोरोना व्हायरसचे सावट असल्यामुळे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या चर्चेनंतर शिवसेनेची शरयु नदीवर होणारी नियोजित महाआरती रद्द करण्यात आली आहे. कोरोना व्हायरसचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकार आणि आरोग्य विभागांनी लोकांची गर्दी होणाऱ्या ठिकाणांवर बंदी घातली आहे. त्यामुळे शरयू महाआरतीसाठी हजारोंच्या संख्येनं होणारी गर्दी आणि कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून शिवसेनेची शरयू महाआरतीला परवानगी देण्यात आलेली नाही.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येत दाखल झाल्यावर त्यांची पत्रकार परीषद होणार आहे. त्यानंतर ते राम जन्मभूमीत रामलल्लाचे दर्शन घेणार आहे. यावेळी त्यांच्या सोबत रश्मी ठाकरे आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे हे देखिल उपस्थित असणार आहेत. शिवसेनेच्या या अयोध्या दौऱ्यासाठी पक्षाचे नेते, मंत्री, खासदार, आमदार देखील उपस्थित राहणार आहेत. मुंबई आणि ठाण्याहून हजारोंच्चा संख्येने शिवसैनिक अयोध्येत दाखल झालेत. राज्यात महाविकास आघाडीच्या सरकारमुळे शिवसेनेनं त्यांचं आक्रमक हिंदु्त्त्व मवाळ केल्याचेही आरोप विरोधकांडून केले जात होते. या सर्व आरोपांना शिवसेना आज कृतीतून उत्तर देणार असल्याचं सांगितले जात आहे.