लज्जास्पद : मानवतेला काळिमा फासणारी घटना, ९० वर्षाच्या वृद्धेवर बलात्कार आणि खून

तेलंगणामध्ये ९० वर्षांच्या वृद्धेवर एका नराधमाने बलात्कार केला आणि पकडले जाऊ या भयाने नंतर तिला मारून टाकल्याची लज्जास्पद आणि मानवतेला काळिमा फासणारी घटना घडली आहे. या गुन्ह्यानंतर आरोपी फरार झाला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. दरम्यान या वृद्ध महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नळगोंड्याच्या सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
तेलंगणातल्या अनुमुला या गावात हि घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले. नळगोंडा जिल्ह्यात हलिया मंडलजवळ हे गाव आहे. पीडित ९० वर्षांच्या या आजीबाई एकट्याच राहायच्या. त्यांच्या मुलाचं घर जवळच होतं. रविवारी सकाळी सासूबाईंना चहा देण्यासाठी त्यांच्या घरी गेलेल्या सुनेला त्यांचा मृतदेहच दिसला. घाबरून जाऊन तिने आरडाओरडा केला. पोलिसांना वर्दी देण्यात आली.
मयत वृद्ध महिलेचा इन्क्वेस्ट पंचनामा केल्यानंतर पोलिसांना या ९० वर्षीय महिलेच्या शरीरावर दात आणि नखांच्या जखमा दिसल्या त्यावरून या आजीबाईंवर मृत्यूपूर्वी जबरदस्ती करण्यात आल्याचे पोलिसांना सकृतदर्शनी आढळून आले . या आजींच्या मुलाने पोलिसांत तक्रार दाखल करताना सत्रसाला शंकर या २२ वर्षीय तरुणावर संशय व्यक्त केला आहे. तो आपल्या आईच्या घराजवळ दारूच्या नशेत फिरताना आढळला होता, असं या तक्रारीत मुलाने म्हटलं आहे. २२ वर्षांचा शंकर हा हमाल म्हणून काम करतो. स्त्रियांशी असभ्य वर्तन केल्याच्या तक्रारी त्याच्याविरोधात केल्या गेल्या होत्या. गावातल्या अनेक स्त्रियांना त्यानं छेडलं होतं, असं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं.