महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या आधार प्रमाणीकरणास सुरवात, अनिलकुमार दाबशेडे

औरंगाबाद : महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या आधार प्रमाणीकरणास औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील पाचोड (बु) येथून आज सुरवात करण्यात आली. योजनेतील लाभार्थ्यांची प्राथमिक यादी पाचोड येथे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत पैठण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजूनाना भूमरे यांच्या हस्ते प्रसिद्ध करण्यात आली. आधार प्रमाणीकरण करून सोप्या, सुटसुटीत अशा पद्धतीने पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यास सुरुवात झाली आहे. त्याचप्रमाणे लाभ मिळाल्याची प्रक्रिया सुरू झाल्याचे शेतकऱ्यांना त्यांच्या मोबाईलवर एसएमएस प्राप्त होत असल्याचे जिल्हा उपनिबंधक अनिलकुमार दाबशेडे यांनी सांगितले.
या योजनेत पाचोड (बु) मधील ग्रामीण बँक, राष्ट्रीयकृत बँक, बँक ऑफ बडोदा, जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या २४२ सभासदांची प्राथमिक यादी शासनाने त्या-त्या बँकांच्या स्तरावर प्रसिद्ध केलेली आहे. त्यापैकी ५५ सभासदांचे आधार प्रमाणीकरण यशस्वी झाले आहे. सिल्लोड गावातील ५८२ लाभार्थी शेतकऱ्यांच्या ८९९ खात्यांपैकी १८० खात्यांचे आधार प्रमाणीकरण यशस्वीरित्या पुर्ण झाले असून उर्वरित आधार प्रमाणीकरण करण्याचे काम औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत आणि आपले सरकार सेवा केंद्रावर सुरू आहे.
जिल्ह्यात या योजनेमध्ये एकुण २ लाख २४ हजार ८८३ एवढे लाभार्थी आहेत. त्यापैकी २ लाख २३ हजार ५६६ लाभार्थ्यांचे आधार जोडणी झालेली असून १ हजार २७७ लाभार्थ्यांचे आधार जोडणी प्रक्रिया बॅंकांमार्फत तसेच क्षेत्रीय अधिकारी यांच्याद्वारा संबंधितांशी संपर्क साधून लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे. आतापर्यंत ९९.४३ टक्के लाभार्थ्यांची आधार जोडणी झालेली आहे. तसेच १९९४९५ एवढ्या लाभार्थ्यांची माहिती बॅंकांद्वारा पोर्टलवर अपलोड करण्यात आलेली आहे . तसेच उर्वरीत लाभार्थ्यांची माहिती अपलोड करण्याची प्रक्रिया बॅंकांद्वारा सुरू आहे. या योजनेव्दारे अंदाजीत सरासरी १४८२ कोटी ७० लाख एवढ्या रकमेची कर्जमाफी होणार असल्याचे जिल्हा उपनिबंधक अनिल दाबशेडे यांनी सांगितले.
या योजनेंतर्गत पाचोड येथील भास्कर दळवी यांना ४६८५४ रुपयांच्या कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे. ही शेतक-यांसाठी अतिशय उपयुक्त योजना असून अशी चांगली योजना राबवल्याबद्दल त्यांनी समाधान आणि शासनाचे आभार व्यक्त केले. तसेच अंकुश नरवडे या शेतकऱ्याने १ लाख ९७ हजार ६१६ एवढी मोठी कर्जमुक्ती मिळणार असल्याने खुप मोठा भार हलका झाल्याचे समाधान व्यक्त केले. सुभाष भोजने, दिलीप भूमरे, पांडूरंग भूमरे या शेतक-यांनी कर्जमुक्तीमूळे मोठा दिलासा मिळाल्याच्या भावना व्यक्त केल्या. माझ्यावर २० हजार रूपयांचे पीककर्ज होते परंतु या सरकारने गरिबांचे दु:ख जाणुन सोप्या पद्धतीने कर्जमुक्ती केली. त्यामुळे शासनाने ही कर्जमुक्ती करून चांगला हातभार लावल्याची भावना श्रीमती ज्योती भुमरे यांनी व्यक्त केली. अमोल भूमरे यांनी कुठल्याही प्रकारचे हेलपाटे न घालता सहजपणे ही कर्जमुक्ती मिळाल्याचा आनंद व्यक्त करून शासनाच्या गतिमान कार्यपद्धतीबद्दल समाधान व्यक्त केले.
श्री. भूमरे आणि श्री. दाबशेडे यांच्याहस्ते प्रातिनिधिक स्वरूपात शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास सहायक निबंधक दिलीप गवंडर, माहिती तंत्रज्ञान अधिकारी मयुर मयंक, कर्ज वितरण अधिकारी श्याम तांगडे, श्री. गोर्डे, श्री. बारगजे, श्री. कासार, पाचोड विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष जिजा पा.भुमरे, राम पा.नरवडे, भास्कर दळवी, अंकुश नरवडे, शिवाजीराव भुमरे, आबा पा.भुमरे, पाचोडचे (खु)सरपंच नितिन वाघ आदी उपस्थित होते. या योजनेनुसार १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ पर्यंत उचल केलेल्या एकापेक्षा जास्त कर्ज खात्यात अल्पमुदत पीककर्ज व अल्पमुदत पीककर्जाच्या पुनर्गठीत कर्जाची ३० सप्टेंबर २०१९ रोजी असलेली थकबाकीची परतफेड न केलेली रक्कम २ लाखांपेक्षा कमी असल्यास अशा सर्व खातेदारांना दोन लाख मर्यादेपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येणार आहे.