#DelhiViolence : मृत्यूची संख्या २२ तर २०० हून अधिक जखमी , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शांततेचे आवाहन, म्हणाले “आमची संस्कृतीच शांतीची…”

Had an extensive review on the situation prevailing in various parts of Delhi. Police and other agencies are working on the ground to ensure peace and normalcy.
— Narendra Modi (@narendramodi) February 26, 2020
सीएए , एनसीआर आणि एनपीआरचे विरोधक आणि समर्थक यांच्यात झालेल्या वादाचे पर्यवसान हिंसाचारात झाल्यानंतर आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू झाला असून या पार्शवभूमीवर अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मौन सोडून दंगलखोर दिल्लीकरांना शांतता आणि बंधुभाव राखण्याचे आवाहन केले आहे. या हिंसाचारात २०० हून अधिक जण जखमी झाले आहेत. दिल्लीतील हिंसाचार प्रकरणी स्थितीचा सविस्तर आढावा घेतल्यानंतर हिंसाचारग्रस्त भागात शांतता प्रस्थापित करण्यासाठी पोलीस आणि इतर प्रमुख यंत्रणा कामाला लागल्या असून आवश्यक ते सर्व प्रयत्न सुरू आहेत, असे मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
दरम्यान या प्रकरणी प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार दिल्ली हिंसाचारातील मृतांचा आकडा २२ वर पोहोचला आहे. आज सकाळपासून एकूण ४ मृतदेह हस्तगत करण्यात आले आहेत. यात ‘आयबी’ या गुप्तचर यंत्रणेच्या एका कर्मचाऱ्याचाही समावेश आहे. ते बेपत्ता असल्याची तक्रार त्यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांत केली होती. मृतावस्थेत आढळून आलेले हे आय बी अधिकारी चांदबाद परिसरातील रहिवासी असून कदाचित त्यांचा दगडफेकीत मृत्यू झाला असावा, असा अंदाज पोलिस व्यक्त करत आहेत. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या पूर्वी एका पोलीस अधिकाऱ्यांचाही दंगलीत मृत्यू झाला.
चांदबाग पुलया येथील एका नाल्यातून या आय बी अधिकाऱ्याचा मृतदेह काल संध्याकाळी बाहेर काढण्यात आला, असे सांगण्यात येत आहे. दिल्लीतील जाफराबाद, मौजपूर-बाबरपूर आणि चांदबागेत सुरू असलेल्या हिंसाचारात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या २२ वर पोहोचली आहे. तर, या हिंसाचारात सुमारे २०० लोक जखमी झाले आहेत. मृतांमध्ये पोलिस दलातील जवानाचाही समावेश आहे. त्यांच्या डोक्यावर तलवारीचे वार आढळल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली. मृतदेहावर चाकूचेही वार आढळले आहेत. नाल्यामध्ये हा मृतदेह दगडाखाली दाबून ठेवण्यात आला होता. या अधिकाऱ्याचे कुटुंबीय आधी खजूरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेले होते , मात्र नंतर त्यांनी दयालपूर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील जनतेला शांततेचे आवाहन केले आहे. आमची संस्कृतीच शांतीची आहे, असेही मोदी म्हणाले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गेल्या २४ तासांमध्ये ३ बैठका घेतल्या आहेत. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांनीही दंगलग्रस्त भागांचा दौरा केला आहे.