निर्भया सामूहिक अत्याचार प्रकरणातील आरोपीचा पुन्हा आत्महत्येचा प्रयत्न

संपूर्ण देशाला हादरवून टाकणाऱ्या दिल्लीतील निर्भया गँगरेप प्रकणातील चारही नराधमांना ३ मार्च रोजी सकाळी ६ वाजता फासावर लटकवण्यात येणार आहे. पटियाला हाऊस कोर्टाने चारही नराधमांच्या फाशीच्या मुहुर्तावर शिक्का मोर्तब केला आहे. कोर्टात आरोपींविरोधात नवं डेथ वॉरंट जारी करण्याची मागणी या याचिकेतून करण्यात आली होती. दोषी पवनला कोर्टाने दिलेल्या नव्या वकीलांकडून पहिल्यांदा पवनची बाजू मांडली. मात्र, कोर्टाने ती फेटाळून लावत नवं डेथ वॉरंट जारी केले आहे. कोर्टाने आतापर्यंत जारी केलेले हे तिसरे डेथ वॉरंट आहे.
निर्भया सामुहिक बलात्कार आणि हत्येप्रकरणातील एक दोषी विनय शर्माने पुन्हा एकदा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. याआधीही त्याने भितींवर डोके आपटले होते, आता त्याने स्टेपल पिन गिळण्याचा प्रयत्न केला. तुरूंगातील कर्मचाऱ्यांनी त्याला असे करण्यापासून रोकले. यानंतर तिहार जेलमधील अधिकाऱ्यांनी विनयला त्वरित रुग्णालयात दाखल केले. सध्या विनयवर उपचार सुरू आहे.
या सर्व आरोपींच्या विरोधात डेथ वॉरंट जारी झाल्यापासून विनयने अनेकवेळा हिंसक वर्तन केले आहे. त्यामुळे त्याच्याकडे विशेष लक्ष दिले जात आहे. मात्र तुरूंगात विनयची शारीरिक व मानसिक स्थिती स्थिर असल्याचे जेल अधिकाऱ्यांनी सांगितले. या प्रकरणात फाशी झालेल्या चार दोषींवर चोवीस तास नजर ठेवली जात आहे आणि अधिकारी सतत सीसीटीव्हीद्वारे त्यांचे निरीक्षण करत आहेत. सूत्रांनी सांगितले की, हे चारही दोषी (मुकेश, अक्षय, विनय आणि पवन गुलाब) आधी व्यवस्थित जेवत होते. मात्र आता त्यांनी जेवण सोडले आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून चारही आरोपींचे खाणे कमी झाले आहे. १ मार्च रोजी पटियाला न्यायालयाच्या वतीनं नवीन डेथ वॉरंट जारी केले आहे.
दरम्यान शनिवारी तुरूंगातील अधिकाऱ्यांनी विनय शर्मा आणि अक्षय ठाकूर यांच्या कुटुंबीयांना नोटिसा पाठवल्या आणि त्यांना अखेरचे भेटण्यास सांगितले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुकेश सिंह आणि पवन गुप्ता यांच्या कुटुंबातील सदस्यांसह ३१ जानेवारी रोजी अखेरची बैठक झाली. तिहार कारागृहातील एका अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्यांनी अक्षय आणि विनय यांना विचारले की त्यांना कोणाला भेटायचे आहे? त्यानंतर त्याच्या घरच्यांनी या दोघांची भेट घेतली.