वारीस पठाण यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर खा. इम्तियाज जलील यांची शिष्टाई , अखेर विधान घेतले मागे ….

कर्नाटकाच्या गुलबर्ग्यात बोलताना एमआयएमचे माजी आमदार वारीस पठाण यांनी केलेले वादग्रस्त वक्तव्य मागे घेत असल्याची माहिती खा. इम्तियाज जलील यांनी पुढाकार घेऊन आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत वारीस पठाण यांनी दिली. यावेळी बोलताना वारीस पठाण म्हणाले कि , मी सर्व धर्मांचा आदर करतो. मी कधीही कोणत्या धर्मावर टीका केलेली नाही. तरीही माझ्या विधानाने कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माझे विधान मागे घेतो, असे पठाण यांनी यावेळी नमूद केले. तर आमच्या बाजूने या वादावर पडदा पडल्याचे खा. इम्तियाज जलील यांनी स्पष्ट केले.
देशातील १५ कोटी मुस्लिम १०० कोटी हिंदूंवर भारी पडतील, अशा आशयाचे विधान पठाण यांनी कर्नाटकातील गुलबर्गा येथे सीएए विरोधी आंदोलनप्रसंगी केल्याचा वारिस पठाण यांच्या भाषणाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्याच्या या विधानावरून देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. दरम्यान भाजप, मनसे या पक्षांनी पठाण यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करत त्यांच्याविरुद्ध ठिकठिकाणी आंदोलने केली होती. पठाण यांच्या या प्रक्षोभक भाषणाची गंभीर दखल घेत पक्षानेही त्यांना प्रसारमाध्यमांशी बोलण्यास मनाई केली होती. या पार्श्वभूमीवर एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष व आमदार इम्तियाज जलील यांच्यासह आज पत्रकार परिषद घेत पठाण यांनी आपलं विधान मागे घेत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
AIMIM National Spokesperson @warispathan and AIMIM Maharashtra President and Aurangabad MP @imtiaz_jaleel conducted a press conference. https://t.co/46pZsfch7B
— AIMIM (@aimim_national) February 22, 2020
यावेळी बोलताना पठाण म्हणाले कि , मी भारतीय असल्याचा मला सार्थ अभिमान आहे. मी एक सच्चा मुसलमान आहे. इमानदारीची शिकवण मला बालपणापासून मिळालेली आहे. हिंदू, दलित, शीख, पारसी वा कोणताही धर्म असो मी सर्वच धर्मांचा व हे धर्म मानणाऱ्यांचा आदरच केला आहे. तरीही माझ्या विधानाने कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माझे विधान मागे घेतो व खेद व्यक्त करतो, असे स्पष्टीकरण पठाण यांनी दिले आहे.
दरम्यान नागरिकत्व कायदा (सीएए) ज्यापद्धतीने लादला जात आहे त्यावरून देशभरात मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. १५ कोटी मुस्लिमांसह दलित व अन्य समाजांनीही या कायद्याला विरोध केला आहे. गेल्या दीड महिन्यापासून आमच्या बहिणी रस्त्यावर ठाण मांडून आंदोलन करत आहेत. केवळ शंभर लोक सत्तेच्या जोरावर हे जनआंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याला अनुसरून मी ‘हम १५ करोड सौ पर भारी’ हे विधान केले होते. माझ्या विधानाचा चुकीचा अर्थ काढून मला लक्ष्य करण्यात आले. हे मला तसेच माझ्या पक्षाला बदनाम करण्याचे राजकीय षडयंत्र आहे, असा आरोपही पठाण यांनी केला. निवेदन संपल्यानंतर पत्रकारांच्या प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली असता पठाण यांनी कोणतेही उत्तर दिले नाही. इम्तियाज जलील यांनी हस्तक्षेप करत, आमचे स्पष्टीकरण आम्ही दिलेले आहे. तुम्हाला जो तर्क काढायचा तो काढा. आमच्यासाठी हा मुद्दा येथेच संपला आहे. देशापुढे आणखीही गंभीर विषय आहे. त्याकडे लक्ष देऊया, अशी सारवासारव जलील यांनी केली.