संघाचा बालेकिल्ला असलेल्या रेशीम बागेत काय बोलले चंद्रशेखर आझाद ?

नागपूरच्या रेशीमबागेत कार्यक्रम घेण्यास नागपूर पोलिसांनी परवानगी नाकारल्याने मुंबई हायकोर्टाने सशर्त परवानगी दिल्यानंतर भीम आर्मीचा कार्यकर्ता मेळावा संघाचा गाद असलेल्या रेशीमबागेत पार पडला. या मेळाव्यात भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांनी संघाच्या कार्यपद्धतीवर चांगलीच तोफ डागली. आझाद म्हणाले कि , ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने दुसऱ्याच्या अर्थात, भाजपच्या खांद्यावर बंदूक ठेवून मनुस्मृतीचा अजेंडा राबवण्याऐवजी खोटारडेपणाचा बुरखा काढावा आणि थेट निवडणुकीच्या मैदानात उतरावे’, ‘ बाता राज्यघटनेच्या करतात आणि अजेंडा मनुस्मृतीचा राबवण्यात येतो. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासारखी आम्ही गोळीची भाषणा वापरणार नाही. तुम्ही खुशाल गोळी चालवा. परंतु भाजप नेत्यांनो, एक लक्षात घ्या, सत्ता बदलेल आणि ज्यादिवशी सत्तेत येऊ तेव्हा एकेका अत्याचाराचा हिशेब घेऊ. आमच्यावर अत्याचार करणारे अधिकारी, मुख्यमंत्री वा पंतप्रधान कुणीही असो, बहुजनांची सत्ता आल्यानंतर कुणालाही सोडणार नाही’, असा इशाराही आझाद यांनी दिला.
भीम आर्मीच्या या मेळाव्याला “सिटिझन्स ऑफ इंडिया”चे यास सहकार्य लाभले होते. सीएए आणि एनआरसी विरोधातील या मेळाव्यास उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने विविध अटींसह परवानगी दिल्याने या मेळाव्यात आझाद काय बोलतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. आपल्या ३५ मिनिटांच्या भाषणात त्यांनी संघ, सरसंघचालक मोहन भागवत, भाजप आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर तोफ डागली.
दरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय रेशीम बागेजवळच आहे. शिवाय संघ आणि भीम आर्मीची विचारधारा जुळत नसल्याने भीम आर्मीला रेशीम बाग मैदानावर कार्यकर्ता मेळावा घेण्यासाठी परवानगी देण्यास कोतवाली पोलिसांनी नकार दिला होता. भीम आर्मीच्या मेळाव्यामुळे शहरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असा दावा करीत पोलिसांनी मेळाव्याला परवानगी नाकारली होती. त्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात सादर करण्यात आली होती. या याचिकेवर निर्णय देत खंडपीठाने भीम आर्मीच्या कार्यकर्ता मेळाव्यास सशर्त परवानगी दिली होती. ही परवानगी मिळाल्यानंतर आज हा मेळावा पार पडला.