अकोले येथे इंदोरीकर महाराजांच्या समर्थनार्थ बंद , तृप्ती देसाई यांना कापून टाकण्याची धमकी देणाऱ्या महाराजांच्या मागितली माफी…

प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती देशमुख उर्फ इंदोरीकर महाराज यांच्या समर्थकांनी आणि अकोलेतील वारकऱ्यांनी ‘अकोले बंद’ची घोषणा केली आहे. आज त्यासाठी इंदोरीकर महाराजांचे जन्मस्थान इंदोरी ते अकोले अशी बाईक रॅली काढण्यात येत आहे. या बाईक रॅलीदरम्यान विविध गावांमध्ये लोकांच्या भेटी-गाठी घेण्यात येणार आहे. या रॅलीदरम्यान अनेक महिला समर्थन देण्यासाठी रस्त्यावर उभ्या असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. या रॅलीत इंदोरीकर महाराजांना मानणारा मोठा वर्ग सहभागी झाला आहे. अकोले येथे एका निषेध सभेचेही आयोजन करण्यात आले आहे. यापूर्वीच इंदोरीकर महाराजांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. मात्र काहीजण हा वाद उकरुन काढण्याचा प्रयत्न करीत आहे. यासाठी या निषेध रॅलीचं आयोजन करण्यात आलं असून शांततेच्या मार्गाने हा निषेध नोंदविला जाणार असल्याचे आयोजकांचे म्हणणे आहे. ‘आम्ही इंदोरीकरांचे समर्थक’ असे बॅनर घेतलेले लोक रॅलीमध्ये दिसत आहे.
विविध सामाजिक संघटनांनी हा बंद पुकारला आहे. भजन दिंडी काढून इंदोरीकर महाराजांचे समर्थन करण्यात येणार आहे. तृप्ती देसाई यांनी इंदोरीकर महाराजांच्या तोंडाला काळ फासू असं विधान केलं होतं, यामुळे संतप्त वारकऱ्यांनी बंदची हाक दिली आहे. कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख उर्फ इंदोरीकर महाराज यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर भूमात ब्रिगेडच्या कार्यकर्त्या तृप्ती देसाई आक्रमक झाल्या होत्या. निवृत्ती देशमुख उर्फ इंदोरीकर महाराज यांच्याविरोधात पीसीपीएनडीटी कायद्यानुसार कारवाई झाली नाही तर आपण इंदोरीकर यांच्या अकोल्यात जाऊन त्यांना काळे फासू असा इशारा दिला होता. त्यांच्या या वक्तव्यामुळे मोठा गदारोळ झाला होता.
दरम्यान भूमात ब्रिगेडच्या कार्यकर्त्या तृप्ती देसाईंना फोनवरून कापून टाकण्याची धमकी देणाऱ्या सोमनाथ भोर महाराजांनी अखेर माफी मागितली आहे. अकोले येथील सोमनाथ भोर महाराज यांनी तृप्ती देसाईंची माफी मागितली आहे. माझ्या फोनवरील वक्तव्याशी इंदोरीकर महाराजांचा संबंध नाही. माझा राग अनावर झाल्याने मी बोललो. माझ्या संभाषणाने त्यांच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागतो. अशा शब्दात सोमनाथ भोर यांनी माफी मागितली आहे.