संशयित बांग्ला देशी म्हणून अटक केलेल्यांची न्यायालयाने केली निर्दोष सुटका

मुंबई – तीन वर्षांपूर्वी रे रोड परिसरात राहात असलेल्या तीन संशयित बांग्लादेशी घुसखोरांना गुन्हे अन्वेषण विभागाने मोठ्या शिताफीने अटक केल्यानंतर त्यांच्याकडे उपलब्ध असलेले मतदान कार्ड खोटे असल्याचे न्यायालयात सिध्द न झाल्यामुळे तसेच संशयित घुसखोरांकडे असलेले पुरावे लक्षात घेता त्यांना भारतीय नागरिक म्हणून राहू द्यावे असा निकाल दिला. दरम्यान यातील आरोपी क्रमांक १ बेपत्ता असल्याने त्याचा खटला स्वतंत्ररित्या दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
या विषयीची अधिक माहिती अशी कि , मानखुर्द परिसरातील शांतीनगर झोपडपट्टीमधे एका महिलेसहित दोन बांगला देशी संशयित म्हणून घुसखोर रबीऊल चानमिया मिझी, अब्बास लालमिया शैख (४५) आणि रबियाखातून अब्बास शेख अशा तिघांना गुन्हे अन्वेषण विभागाचे एपीआय पांडुरंग खिल्लारी आणि काॅन्सेटबल वसंत राजाराम पाटील यांनी खबर्याने दिलेल्या माहितीनुसार पुराव्यासहित अटक केली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार वरील आरोपी बांगलादेशी असून त्यांच्याकडे बांग्लादेशातून भारतात कायदेशीर मार्गाने प्रवेश झालेला नव्हता. तसेच पासपोर्ट च्या मदतीने देशात दाखल झाल्याची नोंदही विमानतळावरही नव्हती. या पुराव्या नंतर आरोपींच्या झडतीमधे त्यांच्याकडे मतदार कार्ड सापडले. ते खोटे असल्याचा दावा गुन्हे अन्वेषण विभागाने केला होता परंतु मेट्रोपाॅलिटन कोर्टात सिध्द करता आला नाही. दरम्यान तीन वर्षाच्या काळात कोर्टाने बचाव पक्षाच्या वकीलांना आरोपींकडे असलेले मतदार कार्ड खरे असल्याबाबत खात्री करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार गुन्हे अन्वैषण विभागाला त्यांनी सादर केलेले मतदान कार्ड खोटे असल्याचे सिध्द करता आले नाही. तसेच संशयित घुसखोरांकडे असलेले आधार कार्ड , पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन आदी पुरावे लक्षात घेता त्यांना भारतीय नागरिक म्हणून राहू द्यावे असा निकाल देऊन त्यांची निर्दोष मुक्तता केली तर आरोपी क्रमांक १ बेपत्ता असल्याने त्याचा खटला स्वतंत्ररित्या दाखल करण्याचे आदेश अतिरिक्त मुख्य मेट्रोपॉलिटिन न्यायाधीश ए.एच. काशीकर यांनी दिले.