बार्शी -सोलापूर : क्रुझर जीप आणि बसच्या धडकेत ५ ठार ६ जखमी

क्रुझर जीप आणि एसटीची धडक बसून झालेल्या भीषण अपघातात पाचजण जागीच ठार झाले. या अपघातात ६ जण जखमी झाले असून जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहे. बार्शी-सोलापूर दरम्यानच्या रस्त्यावरील खड्डा चुकवताना हा अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे.
या अपघाताविषयी पोलिसांनी सांगितले कि , आज सकाळी सव्वा दहाच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. बार्शी पंचायत समितीमधील एमएसआरएलएम विभागातील महिला व पुरुष कर्मचारी कामानिमित्त या जीपमधून सोलापूरला जात होते. त्यावेळी, राळेरास-शेळगाव दरम्यान ही भीषण दुर्घटना घडली. एसटी बस आणि जीप समोरासमोर येऊन झालेल्या जोरदार धडकेत जीपचा चक्काचूर झाला. या अपघातात पाच जण जागीच ठार झाले. तर सहाजण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये चार पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार हा रस्ता प्रचंड खराब असून रस्त्यावर खड्डे पडल्याने खड्डा चुकवण्याच्या नादात एसटी आणि जीपची समोरासमोर धडक झाली. हा अपघात अत्यंत भीषण होता. अपघातात जीपचा अक्षरश: चेंदामेंदा झाला. त्यामुळे यात पाचजणांचा जागीच मृत्यू झाला. जखमींचीही प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचं सूत्रांनी सांगितलं. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा लिहिण्याचं काम सुरू केलं असून अधिक तपास सुरू आहे.