चर्चेतली बातमी : गुजरात : साधू संतांची महिलांना अशीही शिकवण , मासिक पाळीच्या काळात स्वयंपाक कराल तर पुढच्या जन्मी कुत्री व्हाल…

गुजरातच्या भुज इथल्या स्वामीनारायण मंदिराच्या स्वामी कृष्णस्वरुप दासजी यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यामुळे आता स्वामी वादात अडकले आहेत. महिलांना धार्मिक शिकवण देताना हे स्वामी म्हणाले कि , एखादी महिलेनं मासिक पाळीच्या काळात स्वयंपाक तर ती पुढच्या जन्मी कुत्री होईल. तसंच अशा महिलांच्या हातचे अन्न खाणारी व्यक्ती पुढच्या जन्मात बैल होईल. स्वामी कृष्णस्वरुप दासजी स्वामीनारायण हे भुज मंदिरात धर्मोपदेशक आहेत.
दरम्यान काही दिवसांपूर्वी गुजरातच्या भूजमधील श्री सहजानंद गर्ल्स इन्स्टिट्यूट मधील ६८ मुलींची अंतर्वस्त्रे तपासून त्यांना मासिक पाळी आहे कि नाही याची तपासणी केली होती त्यावरून मोठी खळबळ उडाली होती. मासिक पाळी असणाऱ्या मुलींना या संस्थेत त्या चार दिवसात मुक्त संचारास बंदी आहे. या काळात त्यांना कुणीही स्पर्श करू नये किंवा त्यांनीही कुणाला स्पर्श करू नये असे संस्थेचे नियम आहेत. या प्रकरणी संस्था चालकांना विचारले असता त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिल्याचे वृत्तही अहमदाबाद मिररने दिले होते.
या प्रकरणात श्री सहजानंद गर्ल्स इन्स्टिट्यूट प्राचार्या रिटा रानिंगा, ३८ , अनिता चौहान , ४९ , वसतिगृह अधीक्षक रमिला हिराणी , सेवक नैना गोरासिया यांच्याविरुद्ध भादंवि ५०६, ३८४, ३५५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रीय महिला आयोगानेही या प्रकरणात चौकशीचे आदेश दिले आहेत. तर पीडित तरुणींच्या कुटुंबियांच्या दबावामुळे प्राचार्य महिलेला निलंबित करण्यात आले आहे. याच वृत्ताचा धागा धरून अहमदाबाद मिररच्या हाती आता गुजरातच्या भुज इथल्या स्वामीनारायण मंदिराच्या स्वामी कृष्णस्वरुप दासजी यांचा हा व्हिडीओ लागला आहे. मात्र त्यांचे प्रवचन नेमके कधीचे आहे ? हे लक्षात येत नाही.
आपल्या एका धार्मिक उपदेशात त्यांनी सांगितलं की, मासिक पाळीच्या काळात महिलेनं अन्न शिजवलं आणि ते एखाद्याने खाल्लं तर त्याचा पुढचा जन्म बैल म्हणून होईल. अहमदाबाद मिररने याबाबतचे वृत्त दिलं आहे. त्यांनी म्हटलं की, पुरुषांनी असं अन्न खाल्लं तर त्यासाठी ते स्वत: दोषी असतील. आपल्या वक्तव्याला शास्त्राचा आधार देत त्यांनी या गोष्टींबाबत स्पष्टपणे लिहिलं आहे कि , लग्नाआधी तुम्हाला माहिती असायला हवं की जेवण कसं खायचं आहे ? स्वामी म्हणाले की, मला माहिती नाही की मी आधी हे तुम्हाला सांगितलं आहे की नाही. पण गेल्या दहा वर्षांत मी पहिल्यांदा हा सल्ला देत आहे. अनेक संत मला सांगत असतात की आपल्या धर्मातील काही तथ्यांवर बोललं नाही पाहिजे.पण मी जर बोललो नाही तर लोकांना कसं समजेल. तुम्हाला जसं ठीक वाटेल ते करा. मात्र शास्त्रात हेच लिहिलं आहे.
याबाबतचा स्वामी कृष्णस्वरुप यांच्या उपदेशाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यानंतर स्वामीनारायण भुज मंदिरच्या विश्वस्तांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र त्यांनी यावर बोलण्यासा नकार देण्यात आला. तसेच या वक्तव्याबाबत कोणती माहिती नसल्याचंही म्हटलं.