ओनर किलिंग : प्रेमाच्या हट्टावर अडून बसलेल्या बहिणीला घातल्या गोळ्या , चुलत भावासह ६ जणांना अटक

“त्याच्याशी प्रेम करू नको ” , असे सांगूनही बहीण ऐकत नाही म्हणून खोट्या प्रतिष्ठेपायी आपल्या चुलत बहिणीची गोळ्या घालून हत्या केल्याची घटना उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये घडली असल्याचे वृत्त आहे. आपल्या चुलत बहिणीचे गावातीलच एका तरुणाशी प्रेम प्रकरण चालू असल्याचे कळल्यानंतर बहीण सांगूनही ऐकत नसल्याने संतप्त चुलत भावाने बहिणीलाच गोळ्या घालून ठार केले. या प्रकरणी पोलिसांनी कुटुंबातील सहा जाणांना ताब्यात घेतले आहे.
या प्रकरणी पोलिसांनी सांगितले कि , सरधाना भागातील १२ वीमध्ये शिकत असलेल्या बहिणीचे प्रेम प्रकरण चालू असल्याचे तिच्या चुलत भावाला कळले होते. यामुळे संतापलेल्या चुलत भावाने तिला समजावण्याचा प्रयत्न केला. पण तिने न ऐकल्याने त्याने तिच्यावर गोळ्या झाडल्या. यात तिचा जागीच मृत्यू झाला. हत्येची ही घटना कुटुंबीयांनी पोलिसांपासून तीन तास लपवून ठेवली आणि पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न केला गेला, असा आरोप आहे. मुलीचे हे प्रकरण तिच्या कुटुंबीयांना माहिती होते. पण त्यांना हे संबंध मंजूर नव्हते. कुटुंबाचा त्यालाविरोध होता. कुटुंबीयांनीही मुलीला समजवण्याचा प्रयत्न केला. पण ती ऐकत नसल्याने कुटुंबीयांनी तिला घरात कोंडून ठेवलं. तिचं बाहेर फिरणंही बंद करण्यात आलं होतं. मुलीच्या काकांचं घर जवळच होतं. तिचा चुलत भाऊही या प्रेम प्रकरणावरून संतापला होता.
दरम्यान शनिवारी रात्री कामानिमित्त मुलगी काकांच्या घरी आली तेंव्हा तिथे चुलत भाऊ आरोपी प्रशांतने तिला प्रेम प्रकरणापासून दूर राहा असं दरडावलं. त्यावरून दोघांमध्ये बाचाबाची झाली. यावेळी मुलीने आपण प्रियकराशीच लग्न करणार असल्याचं ठामपणे सांगितलं. यामुळे आणखी संतापालेल्या चुलत भावाने बहिणीवर तीन गोळ्या झाडल्या. यात मुलीचा जागीच मृत्यू झाला. कुटुंबीयांनी तिला रुग्णालयात नेलं. पण डॉक्टरांनी तिथे तिला मृत घोषित केलं. पोलिसांनी कुटुंबीयांची कसून चौकशी केल्यानंतर मुलीची हत्या प्रतिष्ठेसाठी झाल्याचं समोर आलं. घटनास्थळी घरातील वस्तू पडलेल्या आढळून आल्या. मुलीच्या हातातल्या बांगड्याही तुटलेल्या आढळून आल्या. मृत्यूपूर्वी मुलीने संघर्ष केला असावा. तसंच तिच्या हत्येची घटना लपवण्यासाठी कुटुंबीयांनी रक्त पुसण्याचाही प्रयत्न केला, असा पोलिसांना संशय आहे. या प्रकरणी मुख्य आरोपी प्रशांत, मुलीचे आई-वडील, भाऊ आणि तिच्या काकांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय.