Aurangabad News update : हर्षवर्धन जाधव, सुहास दाशरथेंवर मनपा निवडणुकीची जबाबदारी, मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे स्पष्टीकरण

मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे हे औरंगाबाद दौ-यावर आहेत. मनपा निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांचा दोन दिवसीय दौरा होता. यादरम्यान त्यांनी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी शिवसेनेतून पक्षात प्रवेश केलेल्या सुहास दाशरथे तसेच माजी आमदार हर्षवर्धन जाधव, अभिजीत पानसे, आमदार राजू पाटील, प्रकाश महाजन व दिलीप बनकर पाटील या जाणत्या पदाधिका-यांवर मनपा निवडणुकीची जबाबदारी सोपविली आहे. आज सकाळी सुभेदारी विश्रामगृहात पदाधिका-यांची बैठक घेण्यात आली. यावेळी पदाधिका-यांना मनपा निवडणुकीच्या अनुषंगाने पक्षप्रमुख ठाकरे यांनी काही सूचना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत नवचैतन्य निर्माण करण्यासाठी पक्षप्रमुख ठाकरे यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी लोकसभा निवडणुकीत ताकद दाखविली. त्यांच्या प्रवेशामुळे पक्षाला नक्कीच फायदा होऊ शकतो, अशी भावना कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे. तर शिवसेनेतून नुकताच मनसेमध्ये प्रवेश केलेले सुहास दाशरथे यांचा मनपा निवडणुकीचा गाढा अभ्यास आहे. त्यांना शहरातील प्रत्येक वार्डाची इत्यंभूत माहिती आहे. त्यामुळे त्यांच्या अनुभवाचा फायदा देखील नक्कीच मनसेला होण्याची शक्यता आहे. वार्डातील लोकसंख्येसह इतर माहितीचा खजीना दाशरथे यांच्याकडे असल्याने मनसेला फारसे कष्ट घ्यावे लागणार नाहीत असाही कयास बांधला जात आहे.
भाजपातून प्रवेश केलेले दिलीप बनकर पाटील यांना देखील शहराची बरीच माहिती आहे. त्यांचा देखील दांडगा जनसंपर्क आहे. ग्रामीण भागातील मतदार शहरात स्थायिक असल्याने दिलीप बनकर पाटील यांची मनसेला मदत होईल असे मानले जात आहे. तर प्रकाश महाजन हे प्रखर वक्ता आहेत. त्यामुळे त्यांचा देखील मनसेला फायदा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, अभिजीत पानसे आणि आमदार राजू पाटील हे मार्गदर्शकाची भूमिका निभावतील अशी माहिती मिळते. मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद महानगर पालिका निवडणुकीचे पडसाद इतर जिल्ह्यांमध्ये काय उमटतात. याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे. आज सकाळी शहरातील बारा पदाधिका-यांची गोपनीय बैठक सुभेदारी विश्रामगृहात पार पडल्यानंतर औरंगपु-यातील महावीर भवनात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.