कन्हैयाकुमार यांच्या ताफ्यावर पुन्हा हल्ला , पोलिसांनी हल्लेखोरांना पिटाळले म्हणून…

कन्हैया कुमार यांच्या ताफ्यावर गुरुवारी पुन्हा हल्ला झाला असल्याचे वृत्त आहे. हल्लातून कन्हैया कुमार थोडक्यात वाचले. पण यात त्यांच्या गाडीचे मोठे नुकसान झाले. तसंच त्यांचे काही सहकारीही जखमी झाले. कन्हैया कुमार हे बिहारमधील भोजपूर जिल्ह्यातील आरा येथे नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात आयोजित एका रॅलीसाठी जात होते. कन्हैया कुमारच्या या रॅलीला विरोध करणाऱ्या काही लोकांनी त्यांच्यावर हल्ला केला. कन्हैया कुमारवर झालेला हा आठवा हल्ला आहे. कन्हैया कुमार यांच्या ‘जन गण मन’ यात्रेच्या ताफ्यावर ३० जानेवारीपासून अनेकदा हल्ले झालेत. पण आजचा हल्ला अतिशय जवळून झाला. कन्हैया कुमार ज्या गाडीत बसले होते त्या गाडीवर पहिल्यांदा हल्ला झाला. पण यातून ते बचावले. घनेवेळी ताफ्यात ५ गाड्या होत्या. कन्हैया कुमार बक्सरमधील जाहीर सभेला संबोधित करून येत होते, अशी माहिती काँग्रेस नेते शकील अहमद खान यांनी दिली.
कन्हैया कुमार यांच्या हल्ले होत असल्याने सरकारने त्यांना पोलीस सुरक्षा दिलीय. यामुळे त्यांच्या ताफ्याच्या मागे पोलिसांची गाडी होती. २५ ते ३० तरुणांनी रस्ता आडवल्याने चालकाने गाडी थांबवली. यापैकी काही तरुण मोटारसायकलवर होते. तर काही रस्त्याच्या बाजूला काठ्या आणि दगड घेऊन उभे होते. त्यांनी माथ्यावर पट्टी बांधली होती आणि नारेबाजी करत होते. कन्हैया कुमारच्या सुरक्षेत असलेली पोलिसांची गाडी पुढे निघालेली होती. नेमका त्याचवेळी हल्ला झाला. गाड्यांवर दगडफेक करण्यात आली. पोलिसांना सुगावा लागताच ते घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी हल्लेखोरांना पिटाळून लावलं. पण या घटनेत गाड्यांचे मोठे नुकसान झाले. या घटनेत कन्हैया कुमार थोडक्यात वाचले, असं काँग्रेस नेत्याने सांगितलं.