निर्भया प्रकरणातील दोषी आरोपींच्या “डेथ वॉरन्ट”ची मागणी करताना निर्भयाच्या आईला अनावर झाले अश्रू….

निर्भयाला न्याय मिळावा म्हणून निर्भयाचे माता -पिता न्यायासाठी गेल्या सात वर्षांहून अधिक काळापासून खेटे घालत आहेत. असे असतानाही कायद्याच्या पळवाटा शोधत फाशीच्या शिक्षेपासून वाचू पाहणाऱ्या निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्याकांड प्रकरणातील चारही दोषींविरुद्ध डेथ वॉरंट काढण्याची मागणी निर्भयाच्या आईनं केली असून दोषींना तत्काळ फासावर चढवा, असं म्हणताना बुधवारी न्यायालयात निर्भयाच्या आईला आपले अश्रू अनावर झाले. त्यांनी न्यायाधीशांसमोर आपले म्हणणे मांडताना म्हटले कि , ‘दोषींविरुद्ध तत्काळ डेथ वॉरंट जारी केलं जावं, अशी मी हात जोडून मागणी करतेय’ असं म्हणताना आपल्याच परिस्थितीवर निर्भयाच्या आईला रडू कोसळलं. यानंतर कोर्टाच्या बाहेर मीडियाशी बोलतानाही त्यांचे अश्रू थांबत नव्हते.
निर्भयाच्या दोषींसाठी नवं डेथ वॉरंट जारी करण्यात यावं, या मागणीसाठी निर्भयाच्या आई-वडिलांनी आणि दिल्ली सरकारने दाखल केलेल्या नव्या याचिकेवर बुधवारी दिल्ली न्यायालयात सुनावणी पार पडली. दोन्ही पक्षांचं म्हणणं ऐकूण घेतल्यानंतर न्यायाधीशांनी गुरुवारपर्यंत ही सुनावणी पुढे ढकलली आहे. सुनावणीसाठी न्यायालयात दाखल झालेली निर्भयाची आई यावेळी खूपच भावुक झालेली दिसली. मी गेल्या वर्षभरापासून दोषींना फासावर चढवण्याची तारीख निश्चित केली जावी म्हणून प्रयत्न करतेय. मीही एक आई आहे. गेल्या सात वर्षांपासून न्यायाची वाट पाहतेय. मी तुमच्यासमोर हात जोडते, असं म्हणताना त्यांनी आपले अश्रू आवरणं कठिण झालं होतं.
निर्भयाच्या आईच्या भावनांची दाखल घेतांना न्ययालयाने , “यावर, तुमचं म्हणणं ऐकून घेण्यासाठीच हे न्यायालय आहे. तुमचा प्रत्येक शब्द ऐकला जातोय, असे म्हणत न्यायाधीशांनी त्यांना आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला. मुकेश कुमार सिंह (३२), पवन गुप्ता (२५), विनय कुमार शर्मा (२६) आणि अक्षय कुमार (३१) अशी या दोषींची नावं आहेत. हे सगळे दोषी न्याय प्रक्रियेशी खेळत असल्याचा आरोप निर्भयाच्या आई-वडिलांनी आज न्ययालयात केला.