३४ मुलींवरील सामूहिक अत्याचार प्रकरणात ११ जणांना जन्मठेप

बिहारच्या मुझफ्फरपूर जिल्ह्य़ातील निवारालयात अनेक मुलींचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी मुख्य आरोपी ब्रजेश ठाकूर आणि अन्य ११ जणांना दिल्ली न्यायालयाने मंगळवारी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.दिल्लीतील साकेत न्यायालयाने २० जानेवारी रोजी ब्रजेश ठाकूर याच्यासह १९ आरोपींना दोषी ठरविले होते. या प्रकरणातील एक आरोपी मोहम्मद साहिल ऊर्फ विकी याची न्यायालयाने पुराव्याअभावी मुक्तता केली आहे. साकेत न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायमूर्ती सौरभ कुलश्रेष्ठ यांनी हा निकाल दिला आहे. या प्रकरणी आरोपींविरुद्ध पॉक्सो कायद्यान्वयेही गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मुझफ्फरपूर येथील निवारालयातील ३४ मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचे उघड झाले होते. या मुलींना प्रथम नशेची मात्रा देण्यात येत होती आणि त्यानंतर मारहाण करून जबरदस्तीने लैंगिक शोषण केले जात होते, असे पीडित मुलींनी सांगितले. निवारालयातील कर्मचारीही मुलींवर लैंगिक अत्याचार करीत होते, असे सीबीआयच्या आरोपपत्रामध्ये म्हटले आहे. त्याचप्रमाणे बिहारच्या समाजकल्याण विभागाचे अधिकारीही त्यामध्ये सामील होते, असाही आरोप आहे.
मुख्य आरोपी ब्रजेश ठाकूर याने २००० मध्ये मुझफ्फरपूरच्या कुढनी विधानसभा मतदारसंघातून बिहार पीपल्स पार्टीच्या तिकिटावर निवडणूक लढविली होती, मात्र तो पराभूत झाला होता. आरोपींमध्ये १२ पुरुष आणि आठ महिलांचाही समावेश आहे. टाटा सामाजिक विज्ञान संस्थेने २६ मे २०१८ रोजी बिहार सरकारला दिलेल्या एका अहवालानंतर हे प्रकरण उघड झाले होते. निवारालयातील मुलींचे लैंगिक शोषण होत असल्याचे अहवालामध्ये नमूद करण्यात आले होते.