औरंगाबाद विशेष : शहरात भाजपाला खिंडार तनवाणीसह आठ भाजपा नगरसेवक मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात

औरंगाबाद – भाजपाचे माजी शहराध्यक्ष किशू तनवाणी यांच्या सह आठ नगरसेवक शिवसेनेकडे जाण्याच्या तयारीत आहेत.अशी शिवसेनेच्या वरिष्ठ सूत्रांनी माहिती दिली.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या सतत संपर्कात तनवाणी आहेत. त्यांच्या सोबत गजानन बारवाल, जगदीश सिध्द,जयश्री कुलकर्णी वअन्य पाच जण शिवसेनेत प्रवेश करंत असल्याचे सूत्रांनी सांगितले
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर काँग्रेस , राष्ट्रवादी आणि शिवसेनेतून भाजप मध्ये गेलेल्या कार्यकर्त्यांमध्ये सर्वत्रच चलबिचल चालू असल्याचे चित्र दिसत आहे. ज्या पद्धतीने महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचे सहयोगी मंत्री कामकाज करीत आहेत त्यावरून भाजप नेते पुन्हा सत्तेत येण्याचे स्वप्न पाहत असले तरी शक्यता दिसत नाही परिणामी केवळ सत्तेसाठी भाजपात गेलेल्या कार्यकर्त्यांमध्ये मोठी अस्वस्थता असून ते आपापल्या पक्षात परतण्याच्या दृष्टीने प्रयत्न करीत आहेत.
दरम्यान मुंबई आणि औरंगाबादच्या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहर आणि जिल्हास्तरावर काम करणारे कार्यकर्ते पुन्हा आपल्या मूळ पक्षामंध्ये परतण्याच्या तयारीत आहेत. औरंगाबाद शहरातील काही कार्यकर्त्यांनी नुकताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला आहे. तर काही कार्यकर्ते महापालिका निवडणुकांच्या आधी पुन्हा शिवसेनेकडे वळत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या निकालांनंतर शिवसेनेने भाजपशी काडीमोड घेऊन काँग्रेस -राष्ट्रवादीसोबत आघाडी केल्यामुळे मुंबई आणि औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुकीत भाजपाला मोठा फटका बसण्याची शक्यता असल्याने या दोन्हीही शहराच्या निवडणुकीसाठी भाजपकडून मनसेसोबत युती करण्याचे संकेत दिले जात आहेत. हि नांदी लक्षात घेऊनच भाजपमधील कार्यकर्ते शिवसेनेत जाऊन आपले राजकीय भवितव्य सुरक्षित करू इच्छित आहेत असे दिसत आहे.
मूळ शिवसैनिक असलेले भाजपाचे माजी शहराध्यक्ष किशू तनवाणी शिवसेना आणि आपल्या मित्रांना सोडून भाजपमध्ये गेले होते परंतु त्यांच्या पदरात संघटनात्मक जबाब्दारीशिवाय काहीही पडले नाही , त्यामुळे त्यांच्यासह त्यांच्यासोबतच कार्यकर्ते पुन्हा स्वगृही परतण्याची शक्यता नाकारता येत नाही.