भागवत कथेच्या निमित्ताने , भक्ताची बायको पळविणाऱ्या महाराजाच्या “अशा” उजेडात येताहेत नव्या भानगडी….

भागवत कथा ऐकविण्याच्या बहाण्याने भक्ताचीच बायको पळवून नेणाऱ्या महाराजांच्या अनेक “कृष्ण कथा” उजेडात येत असून यामुळे भक्तांना चांगलाच धक्का बसला आहे. भंडारा जिल्ह्यामध्ये भागवत सप्ताह करण्यासाठी एका गावात आलेल्या एका तथाकथित महाराजाने गावातल्याच एका विवाहित तरुणीला फुस लावून पळवून नेल्याचे उघड झाले असून पोलीस या तथाकथित महाराजांचा शोध घेत आहेत. हा महाराज महाराष्ट्राबाहेर पळून गेल्याचे वृत्त आहे. दरम्यान महाराजाच्या कृष्णकृत्याचा भांडाफोड होत असून त्याच्याबाबत आता नवा खुलासा झाला आहे. या महाराजाला तब्बल ४ बायका असल्याची माहिती समोर आली आहे.
गावाच्या प्रथा आणि परंपरेप्रमाणे भंडारा जिल्ह्यातल्या मोहदुरा इथं अशाच एका भागवत सप्ताहाचं आयोजन करण्यात आले होते. या गावात दिनेशचंद्र मोहतुरे महाराज याला भागवतासाठी बोलावण्यात आलं होतं. बोलण्यात चतुर असलेला हा महाराज भागवत कथा सांगण्याचं काम करतो. सावनेर जवळच्या कुबाडा या गावचा तो राहणारा आहे. वर्षभरापूर्वीही त्याने याच गावात भागवत सप्ताह केला होता. सात दिवस चालेल्या सप्ताहाची नुकतीच समाप्ती झाली. त्यानंतर तो गावातून निघून गेला. गावकऱ्यांनी त्याला चांगलं मानधनही दिलं होतं. मात्र तो गेल्यानंतर एका घरातली तरुण विवाहिता बेपत्ता असल्याचं लक्षात आलं. विशेष म्हणजे ही महिला एका ५ वर्षांच्या मुलाची आईही आहे. तिच्या सासऱ्याची आणि त्याची ओळख होती. तिच्या घरीही तो काही दिवस राहिला होता. त्याच दरम्यान त्याने तिच्याशी सुत जमवलं आणि भागवत सप्ताह संपल्यानंतर तो तिला घेऊन पळून गेला.
घरातल्या लोकांना संशय आल्यानंतर त्यांनी पोलिसांमध्ये तक्रार दिली. पोलिसांनी त्याच्याशी प्रारंभी संपर्क साधला तेंव्हा त्यांचा मोबाईल स्विच ऑफ लागत होता परंतु जेंव्हा मोबाईल लागला तेंव्हा ते दोघे वृंदावनमध्ये असल्याचे त्याने सांगितले . आता या महाराजाच्या अनेक भानगडी समोर येत असून तो विवाहित आहे आणि त्याला एक मुलगीही असल्याचं समोर आलं आहे. तसंच आतापर्यंत त्याने आधी ४ महिलांसोहत असाच प्रकार केल्याचंही उघड झालं असल्यानं भाविकांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे.