हिंगणघाट शिक्षिका जळित प्रकरण : पीडितेवर चौथी शस्त्रक्रिया , प्रकृती नाजूकच पण स्थिर

वर्धा जिल्यातील हिंगणघाट येथील शिक्षिका जळित प्रकरणातील पीडित तरुणीच्या प्रकृतीत सातव्या दिवशीही रविवारी फारशी सुधारणा झाली नसली तरी आज या पीडित तरुणीवर चौथी शस्त्रक्रिया करण्यात आली. पीडित तरुणीची प्रकृती अद्याप नाजूक आहे. सुरू असलेल्या औषधोपचारांना तरुणीकडून फारसा प्रतिसाद मिळत नसल्याने डॉक्टरांनी औषधांमध्ये अंशत: बदल केले. तरुणीच्या शरीरातील प्राणवायुचे घटते प्रमाण पाहता डॉक्टरांनी तिला आज रक्तही देण्यात आले. त्यामुळे कालच्या तुलनेत तिची प्रकृती स्थीर झाल्याचा दुजोरा रुग्णालयातील अतिदक्षता विभागातील अधिकारी डॉ. दर्शन रेवनवार यांनी दिला.
दम्यान शुक्रवारी देखील पीडित तरुणीचा रक्तदाब स्थिर झाल्याने तिच्यावर शल्यक्रिया करण्यात आली होती. तरुणीच्या भाजलेल्या भागाचे रोज निर्जंतुकीकरण करीत स्वच्छ केले जात आहे. सोबतच तिच्या जखमांवरही रोज नवे ड्रेसिंग केले जात आहे. पीडित तरुणीच्या शरीराचा ३५ टक्क्यांहून अधिक भाग भाजला आहे. तिच्या कमरेच्या वरील भाग आगीमुळे भाजल्याने श्वासनलिका, अन्ननलिकादेखील भाजून निघाली आहे. त्यामुळे ही तरुणी सध्या जंतुसंसर्गाशी झुंज देत आहे. तिला ८० टक्के कृत्रिम श्वासोच्छवास प्रणालीवर ठेवण्यात आले आहे.