Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

आपल्या दिल्ली वारीच्या टीकेला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी केला हा निर्धार…

Spread the love

महाविकास आघाडीच्या सरकारने विश्वासघाताची मालिका सुरू केली आहे. शेतकऱ्यांना २५ हजार रुपये दिले नाहीच. कर्जमुक्तीपेक्षा अटीच जास्त ठेवल्या आहेत, सध्याचे सरकार दगाबाजीने सत्तेत आले आहे. आम्ही भविष्यात मोठे यश मिळवल्याशिवाय राहणार नाही. या असा घणाघात करतानाच मला दिल्लीला जाताय का, असे विचारले जाते. पण एक सांगतो; मी पळून जाणाऱ्यांपैकी नाही. जोपर्यंत महाराष्ट्रात सरकार येत नाही, तोपर्यंत दिल्लीला जाणार नाही’, असा निर्धार विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

शिवसंग्राम संघटनेचा १८वा वर्धापन दिन परळच्या नरेपार्क मैदानात झाला. त्यावेळी फडणवीस बोलत होते. मराठा आरक्षणाचा मुद्दा आमच्या सरकारने सोडवला आहे. आता ही लढाई सर्वोच्च न्यायालयात गेली आहे. याप्रश्नी सध्याचे सरकार गंभीर नसून, इतक्या मेहनतीने आरक्षण दिल्यानंतरही त्यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी सरकार काहीच का करीत नाही, असा सवाल फडणवीस यांनी केला. ‘अरबी समुद्रातील शिवस्मारकाचे काम आपल्या सरकारने मार्गी लावले. स्मारकाचे भूमीपूजनही झाले. पण काहीजण उच्च न्यायालयात गेले. मात्र सध्याचे सरकार हा विषयही गांभीर्याने घेत नाही. यात काही घोटाळा असेल तर कारवाई करा असे चंद्रकांतदादा पाटील यांनी आव्हान दिले आहे’, असेही ते म्हणाले.

दरम्यान, ‘महाविकास आघाडी सरकार सत्तेत येऊन तीन महिने झाले तरी शिवस्मारकासाठी १० मिनिटांची बैठकसुद्धा या सरकारने घेतली नाही. मराठा आरक्षणाच्या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष नाही, अशी टीका शिवसंग्रामचे अध्यक्ष आ. विनायक मेटे यांनी केली. शिवजयंतीची तारीख १९ फेब्रुवारी असली पाहिजे हे तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्यासह सगळ्यांनीच मान्य केले होते. या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांना दुटप्पी भूमिका घेता येणार नाही, असेही ते म्हणाले, तर देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच मराठा समाजाला आरक्षण मिळाले. त्यामुळे फडणवीससाहेब तुम्ही पुन्हा १०० टक्के येणार आहात, असे प्रतिपादन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केले. आझाद मैदानात गेल्या दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या मराठा तरुणांच्या आंदोलनाकडे सरकार लक्ष देत नसल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

अख्ख्या कोल्हापुरात फक्त ४८ जण कर्जमाफीत बसतात. जे काम चालू आहे, त्याला स्थगिती देण्याचे काम या सरकारने केले आहे. बदल्याच्या भावनेने ते काम करीत आहेत. लोकशाहीची मूल्ये त्यांना मान्य नाहीत. सत्तेचा माज डोक्यात गेला, तर त्याला खाली आणण्याचे काम आम्ही करू. शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने महाराष्ट्रात सत्ता आणल्याशिवाय राहणार नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!