हिंगणघाट शिक्षिका जळित प्रकरण : आरोपीला पहाटे ६ वाजताच न्यायालय हजर करून तुरुंगात रवानगी

वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथिक शिक्षिका जळीत प्रकरणातला आरोपी आरोपी विकेश ऊर्फ विक्की नगराळे याला आज पहाटे ६ वाजताच पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केले तेंव्हा न्यायालयाच्या आदेशानुसार त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. स्थानिक नागरिकांचा संताप लक्षात घेऊन पोलिसांनी त्याला कोणालाही थांगपत्ता लागू न देता सुरक्षेच्या कारणावरून त्याला पहाटे ६ वाजताच न्यायाधीश रत्नमाला डफरे यांच्या न्यायालयात त्याला हजर करण्यात आलं. दरम्यान न्यायालयाने आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावताच त्याची रवानगी तत्काळ तुरुंगात करण्यात आली.
या घटनेला घडून ६ दिवस उलटले आहेत. पीडितेवर नागपूरच्या ऑरेंजसिटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. तज्ज्ञ डॉक्टरांची टीम प्रयत्नांची शर्थ करत असली तरी पीडितेची प्रकृती चिंताजनकच असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे . एकतर्फी प्रेमातून एका विवाहित तरुणाने शिक्षिका असलेल्या पीडितेला पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला होता. त्यात ती ४० टक्के भाजली होती. त्यानंतर पुढील उपचारासाठी तातडीने तिला नागपूरला हलविण्यात आले . आरोपीने तिला पेटवून दिल्यानंतर पेट्रोलच्या धुरामुळे तिच्या श्वसन नलिकेत धुर गेला असल्याने तिला श्वास घेण्यास त्रास होत आहे. तिच्या डोळ्याच्या वरचा भाग, कानही जळाले आहेत. तिला अजुनही बोलता येत नाही. मुंबईचे तज्ज्ञ डॉक्टर तिच्यावर उपचाराची शर्थ करीत असून तिच्या उपचाराचा सर्व खर्च महाराष्ट्र सरकार करणार असल्याची घोषणाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.