दुनिया : कोरोना व्हायरस अपडेट : चीनची परिस्थिती अद्यापही आटोक्याबाहेर , जगभर सतर्कता

चीनमध्ये करोना विषाणूने घातलेले थैमान आटोक्यात येणे दिवसेंदिवस अवघड होत असून या विषाणूमुळे झालेल्या मृतांची एकूण संख्या ६३६ झाली आहे. विषाणूचा संसर्ग झालेल्यांची संख्याही ३१ हजारांवर गेली आहे, अशी माहिती चीनच्या आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली. हुबेई प्रांत आणि त्याची प्रांतिक राजधानी वुहान हा या विषाणूच्या साथीचे केंद्र आहे. वुहानमध्ये गुरुवारी ६९ जण मृत्युमुखी पडले. जिलिन, हेनान, गुआंगडाँग, हैनान या प्रांतात प्रत्येकी एक जण मृत्यमुखी पडला आहे, असे चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने म्हटले आहे.
चीनमधील ३१ प्रांतात मिळून विषाणूग्रस्तांची संख्या ३१,१६१ झाली आहे. गुरुवारअखेरपर्यंत १५४० जणांना उपचारांनंतर घरी सोडण्यात आले. आतापर्यंत १९ परदेशी नागरिकांना या विषाणूची लागण झाल्याचेही चीनने जाहीर केले आहे. मात्र, हे नागरिक कोणत्या देशाचे आहेत, ते उघड केलेले नाही. चीनने गुरुवारी खास करोनाग्रस्तांच्या विलगीकरणासाठी १५०० खाटांचे सुसज्ज हॉस्पिटल कार्यान्वित केले. हॉस्पिटलांचा अभाव आणि पुरेशा खाटा नसणे यामुळे हुबेई प्रांतात करोनाबळींची संख्या वाढते आहे, असा दावा चीनच्या अधिकाऱ्यांनी केला. चीनमधून जगभर पसरलेल्या कोरोना व्हायरनं अक्षरश थैमान घातले आहे. चीनमधल्या वुहान शहरात या विषाणूने अधिक थैमान घातले आहे.
डॉ. ली वेनलियांग यांच्या मृत्यूची चौकशी
स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार वुहान शहरात अगदी सात दिवसात स्वतंत्र हॉस्पिटलची निर्मिती करण्यात आली आहे. परंतु रुग्णांची संख्या इतकी झपाट्यानं वाढत आहे कि , नवे हॉस्पिटलही रुग्णांसाठी अपुरे पडत आहेत. वुहान शहारात राहणारे अनेक लोक जीव वाचवण्यासाठी इतरत्र स्थलांतरकरीत आहेत. दरम्यान कोरना विषाणूची सर्वप्रथम जगाला माहिती देणारे डॉ. ली वेनलियांग यांच्या गुरुवारी झालेल्या मृत्यूची चौकशी करण्याचे आदेश चीनने दिले आहेत. डॉ. वेनलियांग यांच्या मृत्यूच्या तपासासाठी शिस्तपालन आयोगाचे पथक वुहानला भेट देईल. डॉ. वेनलियांग यांच्यावरील उपचारांत हलगर्जीपणा झाला का याचा तपास केला जाणार आहे. वेनलियांग यांचा इशारा पोलिसांनी दाबून ठेवल्याचा आरोप होत आहे. वेनलियांग यांच्या मृत्यूनंतर ट्विटरप्रमाणे असलेल्या ‘वेईबो’वर मोठ्या प्रमाणावर लोकांनी संताप व्यक्त केला. आम्हाला भाषणस्वातंत्र्य हवे आहे, अशा शब्दांत लोकांनी मागणी केली. मात्र सरकारने लगेचच त्यावर निर्बंध लागू केले.
व्हरायसचा मुळाचा शोध घेण्यासाठी संशोधकांचे अथक प्रयत्न
करोना विषाणूच्या संसर्गावरून अनेक तर्क वितर्क लावण्यात येत असून काही संशोधकांच्या मतानुसार हा व्हायरस वटवाघळांतून मानवापर्यंत खवल्या मांजरामुळे झाला असावा, असा अंदाज लावण्यात येत आहे. करोनाग्रस्त व्यक्तींची जनुकीय मालिका (जेनेटिक सिक्वेन्स) खवले मांजराच्या जनुकीय मालिकेशी ९९ टक्के जुळल्यामुळे हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. साउथ चायना अॅग्रिकल्चरल युनिव्हरसिटीतील संशोधकांनी ही माहिती दिली आहे. या अभ्यासासाठी सुमारे १००० वन्य प्राण्यांची जनुकीय माहिती तपासण्यात आली.
जगभर कशात , जपानने चिनी जहाजाला आपल्या हद्दीत प्रवेश नाकारला
दरम्यान जगभर याविषयी दक्षता घेण्यात येत असून चीनवरून आलेले जहाज ४१ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर जपानने परत पाठवले. या जहाजावरील ४१ जणांना करोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या शिवाय एक आलिशान जहाजही परत पाठविण्यात आले आहे. हे जहाज टोकियोजवळील योकोहोमा बंदरात विलग करून नांगरण्यात आले होते. त्यावरील २० संसर्गित रुग्णांना आधीच बाहेर काढून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. जहाजावर एकूण ३७०० प्रवासी आहेत. या जहाजावरील सर्व परदेशी प्रवाशांना प्रवेश नाकारत असल्याचे जपाने पंतप्रधान शिंजो अबे यांनी शुक्रवारी जाहीर केले. सध्या हे जहाज जपानच्या मुख्य भूमीपासून लांब असलेल्या ओकिनावा प्रांतातील इशिगाकी बेटांजवळ असून, ते आश्रयासाठी एखादे बंदर शोधत आहे. कोणीही प्रवाशांना उतरवून घेण्यास तयार नसल्यामुळे प्रवासी उद्विग्न झाले आहेत.