रजनीकांतकडून सीएए , एनआरसी आणि एनपीएचे समर्थन

देशभरात नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून गदारोळ माजलेला असतानाच दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनी ‘सीएए’ला पाठिंबा देणारं वक्तव्य केलं आहे. ‘नागरिकत्व कायदा हा देशातील मुस्लिमांच्या विरोधात नाही. या कायद्यामुळं एकाही मुस्लिमाला फटका बसल्यास त्यासाठी मी सर्वात आधी आंदोलन करेन,’ अशी ग्वाही रजनीकांत यांनी दिली आहे. चेन्नई येथील निवासस्थानी ते पत्रकारांशी बोलत होते.
रजनीकांत पुढे म्हणाले कि , ‘सीएए कायद्यामुळं मुस्लिम नागरिकांना कुठलाही फटका बसणार नाही. तसं झाल्यास सर्वात प्रथम मी रस्त्यावर उतरून सीएए विरोधी आंदोलनाचं नेतृत्व करेन’. भारतीय मुस्लिमांना कुणीही दूर लोटू शकत नाही. ज्यांना पाकिस्तानात जायचं होतं, ते फाळणीच्या वेळीच तिकडं गेले आहेत. मात्र, भारताला मातृभूमी मानणारे मुस्लिम कुठेही गेले नाहीत. सीएए कायद्याच्या मुद्द्यावरून त्यांच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचे प्रयत्न काही लोक करत आहेत. काही राजकीय पक्ष सीएएवरून लोकांची दिशाभूल करत आहेत. विद्यार्थ्यांनी राजकीय पक्षांच्या या प्रचाराला बळी पडू नये. कुठल्याही आंदोलनात उडी घेण्याआधी त्यांनी हा विषय पूर्णपणे समजून घ्यायला हवा,’ असं रजनीकांत म्हणाले.
एनपीआर बद्दल बोलताना ते म्हणाले कि , भारतात नेमके किती घुसखोर आहेत, याची अचूक माहिती घेण्यासाठी राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अत्यंत आवश्यक आहे. काँग्रेसनं २०११ साली त्याची अंमलबजावणी केली होती. २०१५ मध्येही ती झाली आणि आता पुन्हा होत आहे. मात्र, राष्ट्रीय नागरिक नोंदणी एनआरसीची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. त्यावर केवळ चर्चा सुरू आहे,’ असे सांगताना तामिळनाडूत राहत असलेल्या श्रीलंकनं निर्वासितांना दुहेरी नागरिकत्व द्यायला हवं, अशी मागणीही त्यांनी केली.