निर्भया अत्याचार प्रकरणातील आरोपीची दया याचिका फेटाळली , आता सर्व आरोपींच्या प्रतीक्षा फाशीची

निर्भया बलात्कार आणि हत्याकांडातील आरोपी अक्षय ठाकूरची दया याचिका राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी फेटाळून लावली आहे. या आधी राष्ट्रपतींनी या प्रकरणातील दोषी मुकेश आणि विनयची दया याचिका फेटाळलेली आहे. त्यामुळे निर्भयाच्या दोषींची फाशी निश्चित मानली जात आहे. अक्षय ठाकूरने १ फेब्रुवारी रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे दया याचिका सादर केली होती. मात्र राष्ट्रपतींनी त्याची दया याचिका फेटाळून लावली आहे. दरम्यान, आज दिल्ली उच्च न्यायालयाने निर्भया प्रकरणातील सर्व आरोपींना झटका दिला आहे. न्यायालयाने सर्व आरोपींना एकत्रित फाशी देण्याचे आदेश दिले आहेत. या आरोपींना वेगवेगळी फाशी देऊ नये, असं कोर्टाने म्हटलं आहे.
निर्भयाच्या दोषींना लवकरात लवकर फासावर लटकवण्याची मागणी करणारी याचिका केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांनी केली होती. कोर्टाने ही मागणी फेटाळून लावत निर्भया प्रकरणातील सर्व दोषींना ७ दिवसांमध्ये सर्व कायदेशीर मार्ग तपासण्याची डेडलाइनही दिली आहे. दिल्ली हायकोर्टाच्या या निर्णयाचे निर्भयाची आई आशादेवी यांनी स्वागत केले आहे. कायदेशीर मार्ग तपासण्यासाठी आता सर्व दोषींकडे केवळ ७ दिवस उरले आहेत. यानंतर दोषींना त्वरीत फाशीवर चढवले पाहिजे, असे आशादेवी म्हणाल्या. दरम्यान, निर्भयाप्रकरणातील दोषी मुकेश कुमार सिंह, पवन गुप्ता, विनयकुमार शर्मा आणि अक्षय कुमार हे चारही तिहार जेलमध्ये कैद आहेत.