कोणत्याही आंदोलनामध्ये लहान मुलांना आणण्यावर बंदी घाला, बारा वर्षीय झेनची सर्वोच्च न्यायालयात याचिका

राष्ट्रीय शौर्य पुरस्कार विजेती बारा वर्षीय विद्यार्थिनी झेन सदावर्ते हिच्या वतीने कोणत्याही आंदोलनामध्ये लहान मुलांना आणण्यावर बंदी घालावी, अशी मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली आहे. दक्षिण दिल्लीतील शाहीन बागमध्ये झालेल्या आंदोलनादरम्यान चार महिन्यांच्या मोहम्मद जहांचा मृत्यू झाला होता. सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) याविरोधातील आंदोलनात पालकांसोबत सहभागी झालेल्या मोहम्मदला प्राण गमवावे लागले होते.
दिल्लीच्या शाहीन बागेतील मोहम्मदच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर, लहान मुलांना आंदोलनात सहभागी करण्यावर बंदी घालावी, अशी मागणी करणारी याचिका झेनने सर्वोच्च न्यायालयात केली आहे. मोहम्मदच्या मृत्यूचं नेमकं कारण डेथ सर्टिफिकेटमध्ये नमूद नाही, त्यामुळे पोलिस आणि संबंधित प्रशासनांना या प्रकरणी तपास करण्याचे आदेश देण्याची विनंतीही झेनने केली आहे. मुंबईकर झेन सदावर्ते हिला प्रजासत्ताक दिनी राष्ट्रीय शौर्य पुरस्कार जाहीर झाला आहे. तिने मुंबईतील रहिवाशी इमारतीला लागलेल्या आगीत अडकलेल्या १७ जणांना बाहेर काढलं होतं.
मुंबई उच्च न्यायलयातील अॅड. गुणरत्न सदावर्ते यांची झेन सदावर्ते ही मुलगी आहे. २२ ऑगस्ट २०१८ रोजी मुंबईच्या हिंदमाता परिसरातील क्रिस्टल टॉवर या इमारतीत आग लागली होती. त्यात चौघांचा मृत्यू झाला होता. तर १८ जण जखमी झाले. झेनच्या प्रसंगावधानामुळे तब्बल १७ जणांचा जीव वाचला होता. झेन हि डॉन बॉस्को इंटरनॅशनल शाळेची विद्यार्थिनी आहे.