एल्गार प्रकरणाचा एनआयकडून नव्याने एफआयआर , ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल , तपासाबाबत कोर्टाचा ६ फेब्रुवारीला निकाल

एनआयएने आज नव्याने एल्गार परिषदप्रकरणी एफआयआर दाखल केला आहे. या एफआयआरमध्ये एकूण ११ जणांची नावं असून त्यापैकी नऊ जण सध्या तुरुंगात आहेत. या सर्वजणांवर दहशतवाद विरोधी कायदा यूएपीए आणि भादंविच्या कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एनआयएच्या नव्या एफआयआरमध्ये संशयितांविरोधात देशद्रोहाचं कलम मात्र लावण्यात आलेलं नाही.
एल्गार परिषद प्रकरण एनआयएकडे वर्ग करण्याच्या याचिकेवर आज कोर्टात सुनावणी झाली. यावेळी एनआयएने हे प्रकरण आपल्याकडे सोपवण्याची विनंती कोर्टाला केली. त्यावर आता ६ फेब्रुवारी रोजी निर्णय होणार आहे. दरम्यान, एनआयएने एल्गार परिषद प्रकरणी ११ जणांविरोधात नव्याने गुन्हे दाखल केले आहेत. त्यापैकी नऊजण तुरुंगात आहेत. या सर्वांविरोधात दहशतवादविरोधी कायद्यांतर्गत आणि भादंवि कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र भादंवि कलमाच्या १२४ए (देशद्रोह) गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. पुणे पोलिसांना या प्रकरणात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करायचा होता. मात्र एनआयएच्या एफआयआरमध्ये या गुन्ह्याचा उल्लेखही करण्यात आलेला नसल्याचं अॅड सिद्धार्थ पाटील यांनी सांगितलं.
सध्या हा विषय चर्चेचा झाला असून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोरेगाव-भीमा दंगल ही राज्य सरकार पुरस्कृत असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर केंद्र सरकारने हा तपास एनआयए या राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपवला होता. मात्र एनआयएकडे खटला वर्ग करण्यास राज्य सरकार उत्सुक नसल्याने या प्रकरणावरून राज्य आणि केंद्र सरकार आमने-सामने उभे ठाकले आहे.
या प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यानुसार सुरेंद्र गडलिंग, सुधा भारद्वाज, शोमा सेन, वरवरा राव, अरुण परेरा, व्हर्नन गोन्सालवीस, महेश राऊत कारागृहात स्थानबद्ध आहेत. नक्षलवाद्यांशी संबंध आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट आखल्याच्या संशयावरून या सर्वांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी अनेक आरोप-प्रत्यारोपही होत आहेत.