विवाहित बहिणीच्या घरात घुसून तिची छेड काढणाऱ्या गुंडाचा भावाने केला खातमा

नागपूरच्या मिनिमाता नगर परिसरात विवाहितेच्या घरात शिरून तिच्या अब्रूवर हात घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या करणाऱ्या गुंडाचा विवाहितेच्या भावाने खातमा केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. विशेष म्हणजे या गुंडाची हत्या केल्यानंतर पळून न जाता विवाहितेच्या भावाने स्वतःच पोलीस ठाण्यात जाऊन आपल्या गुन्ह्याची कबुली देत पोलीस ठाण्यात आत्मसमर्पन केलं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर विवाहितेची छेड काढल्याची माहिती मिळताच त्याच परिसरात फिरत असलेल्या गुंडाचा अखेर विवाहितेच्या लहान भावाने परिसरातील मंदिराच्या आवारातच खून केला आणि पोलिसांकडे जाऊन आत्मसमर्पण केले. एखाद्या चित्रपटाला शोभेल असा हा थरार काल मध्यरात्री नागपूरच्या मिनिमाता नगर परिसरात घडला आहे. प्रारंभी त्यांच्यात वाद झाला परंतु वादानंतरही आरोपीच्या बहिणीची छेडछाड करणारा रोशन हा मिनिमाता नगर परिसरातून गेला नाही आणि तिथेच घुटमळत राहिला. थोड्या वेळानंतर गुरु घासीदास गुरुद्वारा परिसरात त्याने पुन्हा विवाहितेचा भाऊ राजा भारती सोबत वाद घातला आणि चाकू हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस हाणामारीत राजा भारतीने रागाच्या भरात गुंड रोशन चौरसियाच्या हातून चाकू हिसकावून घेत त्याचा खून केला.