सांस्कृतिक कार्यमंत्री यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सवाचे उद्घाटन

अलीकडच्या काळात चित्रपटांची परिभाषा बदलली आहे.आज सिनेमामध्ये वेगवेगळे प्रयोग होत असून ॲनिमेशनसारख्या तंत्रज्ञानाचा बोलबाला आहे. प्रेक्षकांची मने जिंकणारा सिनेमा येणाऱ्या काळात उत्तुंग शिखर गाठेल, असा विश्वास सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी व्यक्त केला. वरळीतील नेहरु सेंटर येथे 16 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल फॉर डॉक्युमेंटरी, शॉर्ट फिक्शन आणि ॲनिमेशन अर्थात मिफ्फ 2020 चे उद्घाटन सांस्कृतिक कार्यमंत्री श्री. देशमुख यांच्या हस्ते झाले.
यावेळी केंद्रीय पर्यावरण,वने आणि हवामान बदल विभागाचे राज्यमंत्री बाबूल सुप्रियो, माहिती आणि प्रसारण विभागाचे सहसचिव अतुल कुमार तिवारी, दिग्दर्शक व निर्मात्या उषा देशपांडे,मिफ्फ महोत्सवाच्या संचालक स्मिता वत्स- शर्मा,माजी नगरपाल किरण शांताराम, आदिती अमित देशमुख आदी उपस्थित होते.
यावेळी श्री. देशमुख म्हणाले, फिल्म्स डिव्हिजन आयोजित मिफ्फ हे भारतातील (माहितीपट) डॉक्युमेंटरी फिल्म चळवळीची परिभाषा मांडणारे महत्त्वपूर्ण आणि सशक्त अंग आहे. या माध्यमातून अनेक सृजनशील तरुणांचे चित्रपट निर्मितीचे स्वप्न-सत्यात उतरले आहे. मिफ्फचे स्तर आणि आवाहने निरंतर वाढत असले तरी महाराष्ट्र शासनाचे सातत्याने पाठबळ मिळाल्यामुळे हा जगभरातील डॉक्युमेंटरी आणि लघुपटांचा सर्वात प्रतिष्ठित उत्सव बनला आहे.
डॉम्युमेंट्री आणि लघुपट खरे फिक्स्ड डिपॉझिट- बाबूल सुप्रियो
अनेकदा एफ.डी म्हणजे फिक्स्ड डिपॉझिट असा आपण अर्थ लावतो.परंतु खरी एफ.डी ही डॉम्युमेंट्री आणि लघुपट आहेत कारण ते देशाची समृद्ध परंपरा, इतिहास जगासमोर मांडून भावी तरुण पिढी घडवतात.मानवी आयुष्यात डॉक्युमेंट्स म्हणजेच दस्तऐवजांची नितांत गरज असते.आयुष्यातील दस्तऐवजाच्या महत्त्वाप्रमाणे डॉक्युमेंटरी हा मनोरंजनासाठी लागणार महत्त्वाचा घटक आहे. आशयाची मुद्देसूद मांडणी,डॉक्युमेंटरीला दिलेले संस्कार, कथा या साऱ्या गुणांमुळे डॉम्युमेंट्री कायम लक्षात राहते.
मिफ्फ ने सन १९९० पासून मुंबई आणि देशातील चित्रपट निर्मात्यांच्या उत्कटतेला वाव दिला आहे. अनेक वर्षांच्या प्रवासात या महोत्सवातील चित्रपटाने उच्च प्रतीची सामग्री व प्रतिभा निर्माण केली आहे.भारत आणि जगातील ज्वलंत डॉक्युमेंटरी संस्कृतीला समर्थन दर्शवित यंदाच्या आवृत्तीत बत्तीस देश, आठशे चित्रपट आणि तीन हजार शिष्टमंडळाने भाग घेतला.या वर्षापासून जलसंधारण आणि हवामान बदल या ज्वलंत विषयावरील शॉर्ट फिल्म प्रकारात 32 विशेष पुरस्कार दिले जाणार आहेत.या महोत्सवात स्पर्धेव्यतिरिक्त विविध देशांचे अॅनिमेशन. पुरस्कारप्राप्त चित्रपट, ऑस्कर पॅकेज, बालकांचे डॉक्युमेंटरी चित्रपट, नॉर्थ-ईस्ट पॅकेज, सार्वजनिक सेवा प्रसारण संस्थेचे चित्रपट, श्रद्धांजली आणि पूर्वगामी भागातील चित्रपट इत्यादी या चित्रपट महोत्सवात दाखवले जाणार आहेत.
मुंबई ही भारतीय चित्रपटसृष्टीची मातृभूमी आहे. चित्रपट लहान, पूर्ण लांबीचे किंवा अॅनिमेटेड असो भारतीय चित्रपटसृष्टी ही चित्रपट निर्मात्यांची प्रथम निवड असते.मुंबई अनेक चित्रपट महोत्सवांसाठीचे प्रमुख शहर आहे. चित्रटांशी संबंधित सर्व कामकाजात राज्य सरकारची धोरणे सहाय्यक राहिली आहेत. राज्याचे सांस्कृतिक मंत्री म्हणून येणाऱ्या काळात असाच पाठिंबा दर्शवणार असल्याचे श्री. देशमुख यांनी सांगितले.या उद्घाटन सोहळ्यात व्ही.शांताराम जीवन गौरव पुरस्कार एम.व्ही. कृष्णस्वामी यांना उपस्थितांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.तसेच उत्कृष्ट माहितीपट बनविणाऱ्या निर्मात्यांना आणि निवड समितीला देखील सन्मानित करण्यात आले