जागतिक अर्थतज्ज्ञ अभिजीत बॅनर्जी यांनी व्यक्त केली देशाच्या अर्थव्यवस्थेवर चिंता , लवकर बाहेर पडू असं वाटत नाही…!!

देशाच्या सध्याच्या अर्थव्यवस्थेवर चिंता व्यक्त करताना अभिजीत बॅनर्जी यांनी यावेळी विविध मुद्द्यावर भाष्य केलं. ते म्हणाले कि , अर्थव्यवस्थेच्या समस्येतून आपण लवकर बाहेर पडू असं वाटत नाही. त्यासाठी बराच काळ लागेल. अर्थव्यवस्था सुधारेल एवढा पैसा सध्या आपल्याकडे नाही. बँकिंग सेक्टरमध्येही पैसा लावू शकू अशी आपली परिस्थिती नाही. अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी निरंतर प्रयत्न करण्याची गरज आहे, असं मत बॅनर्जी यांनी व्यक्त केलं.
जयपूर लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये बोलताना अर्थतज्ज्ञ अभिजीत बॅनर्जी आपले मत व्यक्त करताना म्हणाले कि , कोणत्याही लोकशाही व्यवस्थेत विरोधी पक्ष हा लोकशाहीचं हृदय असतो. सत्ताधाऱ्यांनाही सत्तेवर वचक रहावा म्हणून चांगल्या विरोधी पक्षाची गरज असते. सध्याची परिस्थिती पाहता मला वाटतं भारताला चांगल्या विरोधी पक्षाची गरज आहे, असं मत प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ आणि नोबल पुरस्कार विजेते अभिजीत बॅनर्जी यांनी व्यक्त केलं.
गरिबी ही कॅन्सरसारखी असते. कॅन्सरमुळे जशा विविध व्याधी जडतात तसं गरिबीचं असतं. काहींच शैक्षिणक दारिद्र्य असतं, काहींचं आरोग्याचं तर काहींच्याकडे संपत्तीचं दारिद्र्य असतं. त्यामुळे आपण काय गमावलं हे आपणच शोधलं पाहिजे. कठोर मेहनत करून या समस्येवर तोडगा काढला पाहिजे, असं त्यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी देशवासियांना धर्म आणि जातीच्या आधारे मतदान न करण्याचं आवाहनही केलं आणि उत्तर प्रदेशातील त्यांच्या एका कँम्पेनचा किस्साही सांगितला. आम्ही उत्तर प्रदेशात एक मोहीम हाती घेतली होती. त्यावेळी लोकांना धर्म आणि जातीच्या आधारे मतदान न करण्याचं आवाहन केलं होतं. विकास आणि इतर मुद्दे लक्षात घेऊन लोकांनी मतदान करावं हा त्यामागचा उद्देश होता, असंही ते म्हणाले.
मुलांच्या शिक्षणावरही त्यांनी या फेस्टिव्हलमध्ये भाष्य केलं. मुलांना प्रत्येक विषय समजत नसतो. ज्या विषयात त्यांना रुची आहे, तोच विषय त्यांना समजत असतो. त्यामुळे त्यांना जे समजतं तेच त्यांना शिकवलं गेलं पाहिजे. चौथीच्या मुलांना समाजशास्त्र शिकवून चालणार नाही. कारण समाजशास्त्रासाठी वाचन खूप करावं लागतं. त्यामुळे मुलांचा वाचनात रसच नसेल तर अवगत नसलेल्या भाषेतील सिनेमा पाहताना आपली जी अवस्था होते, तिच या मुलांची होईल, असंही ते म्हणाले.