न्यूझीलंडवर मात करून भारताने सामना जिंकून दिली प्रजसत्ताकदिनाची भेट

भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्धचा दुसरा टी-२० सामना ७ विकेटनी जिंकून देशवासियांना प्रजासत्ताक दिनाची भेट दिली. दरम्यान या विजयासह भारतीय संघाने ५ सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या पहिल्या टी-२० भारताने ६ विकेटनी विजय मिळवला होता. प्रथम फलंदाजी करत न्यूझीलंडने भारताला १३३ धावांचे आव्हान दिले होते. पहिल्या सामन्यात २०३ धावा देणाऱ्या भारतीय गोलंदाजांनी दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडला १३२ धावात रोखले. भारताकडून रविंद्र जडेजाने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. तर बुमराह, शार्दुल ठाकूर आणि शिवम दुबे यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
सामन्याच्या प्रारंभी भारतीय संघाची सुरूवात खराब झाली. पहिल्या सामन्याप्रमाणेच दुसऱ्या सामन्यात देखील हिटमॅन रोहीत शर्मा लवकर बाद झाला. रोहितने ८ धावा केल्या. त्यानंतर आलेल्या कर्णधार विराट कोहलीला देखील मोठी धावसंख्या उभी करता आली नाही. तो ११ धावा करून बाद झाला. विराट बाद झाला तेव्हा भारताची अवस्था २ बाद ३९ अशी होती. त्यानंतर श्रेयस अय्यर आणि केएल राहुल यांनी तिसऱ्या विकेटसाठी ८६ धावांची संयमी भागिदारी केली. भारतीय संघ विजयाच्या जवळ आला असताना श्रेयस ४४ धावांवर बाद झाला. दरम्यान राहुलने टी-२०मधील सलग दुसरे अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर राहुल आणि शिवम दुबे यांनी विजयाची औपचारीकता पूर्ण केली.
भारताविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मार्टिन गप्टिल आणि कॉलिन मुन्रो यांनी संघाला शानदार सुरूवात करून दिली. गप्टिलने पहिल्याच षटकात २ षटकार मारून १३ धावा केल्या. पण त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी सुरेख कामगिरी केली. शार्दुल ठाकूरने सहाव्या षटकात गप्टिल याला बाद केले आणि न्यूझीलंडला पहिला धक्का दिला. त्यानंतर नवव्या षटकात शिवम दुबेने मुन्रोला २६ धावांवर बाद केले. सलामीची जोडी बाद झाल्यानंतर ग्रँडहोमला जडेजाने ३ धावांवर बाद करत माघारी पाठवले. त्यानंतर पहिल्या सामन्यात अर्धशतकी खेळी करणाऱ्या धोकादायक केन विल्यम्सनला जडेजाने १४ धावांवर बाद करत न्यूझीलंडला मोठा धक्का दिला. विल्यम्सन बाद झाला तेव्हा न्यूझीलंडची अवस्था ४ बाद ८१ अशी होती. त्यानंतर रॉस टेलरने धावांचा वेग वाढवण्याचा प्रयत्न केला. पण भारतीय गोलंदाजांनी त्याला फार संधी दिली नाही. टेलर अखेरच्या षटकात १८ धावांवर बाद झाला.