वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र बंदमधील तिरंगा अवमान प्रकरण : पालकमंत्री म्हणतात कारवाई होणारच अन् सीपी म्हणतात रिवार्ड देऊ !

अमरावती : भारतीय संविधानाने आंदोलन करण्याचा प्रत्येक भारतीय नागरिकाला अधिकार दिला आहे व त्या अधिकाराचा वापर केलाच पाहिजे. पण आंदोलने शांतीपूर्वक झाली पाहिजे. आंदोलकांना राष्ट्रीय ध्वज तिरंग्याच्या दंडयाने झोडपून तिरंग्याचा अपमान केला असेल त्या पोलीस कर्मचार्यावर कायदेशीर कारवाई करणारच असल्याचे स्पष्ट संकेत जिल्हा नियोजन भवन येथील पत्रपरिषदेत पालकमंत्री अॅड. यशोमती ठाकूर यांनी दिले. तर दुसरीकडे अमरावती शहराचे पोलिस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांची प्रतिक्रीया घेतली असता त्यांनी सांगितले की, आम्ही त्या पोलिसाला रिवार्ड देऊ.
महाराष्ट्र बंद दरम्यान पोलीस प्रशासनाने दगड मारणार्या आंदोलकांवर लाठीचार्ज केला. तर एका पोलीस कर्मचार्याने आंदोलकांना अक्षरश: तिरंग्या झेंड्याच्या काठीनेच झोडपले असल्याचा व्हीडीओ, फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल आहे. तिरंग्याच्या झेंडयाने आंदोलकांना झोडपणार्या पोलीस कर्मचार्यावर कारवाई होणार असा प्रश्न विचारला असता पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी कारवाई करणारच असे स्पष्ट संकेत दिले आहे. पालमंत्री यशोमती ठाकूर पत्रकारपरिषदेत म्हणाल्या की, रमाई आवास योजनेच्या लाभार्थ्यांचे अनुदान रखडल्याने काम बंद पडले आहे. त्या कामांची संबंधित अधिकार्यांकडून पाहणी करण्यात येणार असून अनुदान वितरित करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगितले. विद्यार्थ्यांना शैक्षणिक शिष्यवृत्तीसह खेळाकरिताही शिष्यवृत्ती देण्यात येईल. जिल्ह्यातील पाणीटंचाई, रस्ते यासह अन्य समस्यांवर जिल्हा नियोजन समिती आढावा बैठकीत चर्चा करण्यात आली. तसेच मेळघाटात विकासात्मक बाबींवर चर्चा करण्यात आली. तिवसा येथील क्रीडा संकुलाच्या धर्तीवर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यांमध्ये क्रीडा संकुल निर्माण करण्याचा मानस असून जिल्ह्यातील पाणीटंचाईवर कायम स्वरुपी उपाययोजना करण्यावर भर दिल्या जाईल. जिल्ह्यातील जनसुविधांना प्राधान्यक्रम देणार असल्याची माहिती पालकमंत्री तथा महिला व बालविकास मंत्री अॅड. यशोमती ठाकूर यांनी पत्रपरिषदेत दिली.
पोलीस आयुक्तांकडून ‘त्या’ पोलिसाची पाठराखण
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शुक्रवारी बंद पुकारला होता. तेव्हा एका यवकाने दुकानावर दगडफेक केल्यामुळे पोलिसांनी लाठी चार्ज केला एवढेच नाहीतर एका पोलीस कर्मचार्याने तिंरगा झेंडा असलेल्या काठीने कार्यकर्त्यांना झोडपले होते. याबाबत पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांना विचारपूस केली असता त्यांनी सांगितले की, झेंडा असलेल्या काठीने मारहाण करणार्या पोलीस कर्मचार्याला ५०० रुपयांचा रिवार्ड (बक्षिस) देण्यात येणार आहे. त्यांनी चांगले काम केले आहे. तिंरगा झेंडा खाली पडलेला होता, तो त्या कर्मचार्याने उचलून झेंडयाचा आदर केला आहे. त्यामुळे आम्ही त्या कर्मचार्याला रिवार्ड देणार असे पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांनी सांगितले. पोलीस कर्मचार्याने झेंडा असलेल्या काठीने मारहाण केली ते चुकीचे आहे. त्याने खाली पडलेला झेंडा उचलला त्यावेळी तशा प्रकारचे फोटो निघाले. याबाबत पोलीस आयुक्तांनी विशेष खबर्याकडून माहिती घेतली असता घटनेकडे बघण्याचा दुष्टीकोण सकारात्मक असला पाहिजे असे सुध्दा पोलीस आयुक्तांनी सांगितले आहे.