मुकेश अंबानी यांच्या झेड प्लस सुरक्षेतील जवानांचा गोळी लागून मृत्यू

देशातील प्रमुख उद्योगपती मुकेश अंबानी यांना व्हीआयपी सुरक्षा झेड प्लस आहे. त्याची जबाबदारी केंद्रीय राखीव सुरक्षा बल (सीआरपीएफ) कडे सोपवण्यात आली आहे तर मुकेश यांची पत्नी नीता अंबानी यांनाही सीआरपीएफची वाय दर्जाची सुरक्षा आहे. दरम्यान मुकेश अंबानी यांच्या सुरक्षेसाठी तैनात असणाऱ्या जवानांपैकी एक सीआरपीएफचा जवान गुरुवारी मृतावस्थेत आढळला. रायफलमधून चुकून गोळी सुटल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. पेडर रोडवरील मुकेश अंबानी यांच्या ॲन्टेलिया निवासस्थानाजवळ हा जवान बंदोबस्तासाठी तैनात होता.
प्राथमिक माहितीनुसार त्याच्या बंदुकीतून चुकून गोळी सुटल्याचे म्हटले जात आहे. मात्र त्याने आत्महत्या केली आहे का यादृष्टीनेही पोलीस तपास करत आहेत. देवदन रामभाई बकोत्रा (३०) असे या जवानाचे नाव आहे. मूळचा गुजरातच्या जुनागड येथील मूळ रहिवासी असणारा हा जवान २०१४ मध्ये सीआरपीएफमध्ये रुजू झाला होता. याप्रकरणी गावदेवी पोलिस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपस चालू आहे.