येवले चहा , काय टाकतात पहा… एफडीए कडून झाली मोठी कारवाई , उत्पादन आणि विक्रीवर तूर्त बंदी

महाराष्ट्रात सगळीकडे फ्रँचायजी देऊन लोकांना आपल्या ब्रॅण्डची सवय लावणाऱ्या येवले चहावर अन्न व औषधी प्रशासनाने कारवाई केली असून या कारवाई अंतर्गत सुमारे ६ लाख रुपयाचा साठा जप्त करण्यात आला होता. पुण्यातील अन्न सुरक्षा अधिकारी सर्वश्री इम्रान हवालदार आणि रमाकांत कुलकर्णी यांनी येवला फुड प्रॉडक्ट गोडाऊनमधील विक्रीसाठी पॅकबंद करून ठेवलेला चहा पावडर, साखर, टी मसाला यांचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले होते. शिवाय यासंदर्भात प्रेस नोटदेखील जारी करण्यात आली होती. ‘येवले अमृततुल्य चहा’मध्ये भेसळ झाल्याची माहिती देण्यात आली असून पुढील आदेश येईपर्यंत उत्पादन आणि विक्रीवर बंदी करण्यात आली आहे.
या कारवाईमुळे पुण्यातील सुप्रसिद्ध येवले चहा पुन्हा एकदा अडचणीत आला आहे. अन्न आणि औषध प्रशासनाच्या (एफडीए) अहवालात येवले चहामध्ये भेसळ असल्याचे सिद्ध झालं आहे. बंधनकारक असलेला रंग वापरण्यात येत होता अशी माहिती एफडीएकडून देण्यात आली. म्हैसूरच्या प्रयोगशाळेच्या अहवालानुसार, चहामध्ये भेसळ करण्यात आली आहे. एफडीएने येवले फूड प्रॉडक्टची तपासणी केली असता चहामध्ये रंग टाकण्यात येत असल्याची माहिती अहवालातून समोर आली आहे. अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ अंतर्गत रंगाचा वापर करणं चुकीचं आहे. येवले चहा महाराष्ट्रात एक मोठा ब्रँन्ड झाला आहे. संपूर्ण राज्यात येवले चहाच्या अनेक फ्रँचायजी आहेत. पण या प्रसिद्ध चहामध्ये भेसळ होत असल्याचे उघड झाल्यामुळे चहाप्रेमींमध्ये नाराजी पसरली आहे.
या कारवाईच्या पूर्वीही सप्टेंबर महिन्यामध्ये ‘येवले अमृततुल्य चहा’ विरोधात याआधीही भेसळ होत असल्याचे समोर आले होते . अन्न सुरक्षा आणि मानके कायद्यांतर्गत (FDA) कारवाई करण्यात आली होती.या चहामध्ये मेलानाईटचा भरपूर प्रमाणात वापर होत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. या उत्पादनांवर अन्न सुरक्षा आणि मानके कायदा २००६ अंतर्गत आवश्यक असणारी माहिती छापणं बंधनकारक आहे. पण जप्त केलेल्या पाकिटांवर कोणत्याही प्रकारचे लेबल आढळले नव्हते. त्यामुळे त्यात नेमका कोणता अन्न पदार्थ आहे, त्यात निश्चित कोणता घटक पदार्थ किती प्रमाणात आहेत याबाबतीची कोणतीही माहिती सर्वसामान्यांना देण्यात आलेली नव्हती.
धक्कादायक बाब म्हणजे, अन्न पदार्थाच्या गुणवत्तेबाबत खातरजमा होण्यासाठी प्रयोगशाळेकडून तपासणीही केलेली नाही. शिवाय, येवले फुड प्रॉडक्टकडे अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 अंतर्गत आवश्यक असलेला परवानादेखील नसल्याचं तपासात चौकशीत आढळून आलं होतं. ही सर्व माहिती हाती आल्यानंतर लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून ‘येवले चहा’ला त्यांचे उत्पादन आणि विक्री पुढील आदेश देईपर्यंत बंद ठेवण्यास बजावण्यात आलं होतं.
काय आहे कायद्याचा उद्देश :
अन्न सुरक्षा आणि मानके कायदा 2006 हा कायदा देशभरात 5 ऑगस्ट 2011पासून लागू करण्यात आला आहे. याचं प्रमुख उद्देश जनतेला सुरक्षित, सकस आणि निर्भेळ अन्न पदार्थ उपलब्ध करून देणे असा आहे.