सिद्धी विनायकाच्या चरणी भक्ताने केले ३५ किलो सोन्याचे दान , लाकडी दरवाजांना दिला सोन्याचा मुलामा

शिर्डीचे साईबाबा असोत, तिरुपतीचे बालाजी असोत कि मुंबईकरांचे श्रद्धास्थान असलेले प्रभादेवी येथील सिद्धीविनायक मंदिर असो ज्यांच्याकडे भरपूर आहे असे भक्त भक्तिभावाने दान देताना कुठलाही विचार करीत नाहीत सिद्धिविनायकाच्या चरणी बाप्पाच्या एका भक्ताने ३५ किलो सोन्याचे दान दिले आहे. या सोन्याची किंमत बाजार भावानुसार १४ कोटी रुपये इतकी आहे. मुंबईतील सिद्धीविनायक मंदिर हे देशातील सर्वात श्रीमंत मंदिरापैकी एक आहे. गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी या ठिकाणी दररोज हजारो भाविक देश-विदेशातून येत असतात.
लाखो लोक मुंबईतील सिद्धीविनायक मंदिरात गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी मुंबईत येतात. दरवर्षी कोट्यवधी रूपयांचे दान भक्तांकडून चढवले जाते. या दानामध्ये रोख रक्कम मोठ्या प्रमाणात असते. तर काही भाविक सोन्याचे नाणे, चांदीच्या वस्तू आणि अन्य रत्ने बाप्पाच्या चरणी चढवत असतात. सिद्धीविनायक मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी याविषयी माहिती देताना सांगितले की, गेल्या आठवड्यात एका भक्ताने ३५ किलोचे सोने दान दिले होते. या सोन्याचा वापर मंदिराचा दरवाजा आणि छतावर सोनेरी मुलामा देण्यासाठी करण्यात आला. ३५ किलो सोन्याचे दान दिल्यानंतर या भाविकाने आपले नाव सांगण्यास नकार दिला.
गणेश भक्ताकडून ३५ किलो सोन्याचे दान मिळाल्यानंतर त्याचा उचित वापर करण्यात आल्याचे बांदेकर म्हणाले. त्यामुळे आता सिद्धीविनायकाचे दर्शन घेताना आता भाविकांना एक वेगळाच अनुभव मिळत आहे. याआधी सिद्धीविनायक मंदिराचे दरवाजे लाकडी होते. परंतु, त्यावर आता चमकदार सोनेरी मुलामा देण्यात आला आहे. दानामध्ये मिळालेल्या सर्व सोन्याचा वापर यासाठी करण्यात आला आहे. या कामासाठी १५ जानेवारी ते १९ जानेवारी पर्यंत मंदिर बंद ठेवण्यात आले होते. त्यावेळी हे काम करण्यात आले आहे. दरम्यान, २०१७ मध्ये मंदिराला ३२० कोटी रुपयांचे दान मिळाले होते. याचा वापर सामाजिक कार्यासाठी करण्यात आला होता.