महात्मा गांधी यांना भारतरत्न देण्यासंबंधीची याचिका सर्वोच्च न्यायालयाने काय म्हणून फेटाळली ?

सध्या भारतरत्न देण्याच्या मागणीवरून मोठा बोलबाला आहे . दरम्यान महात्मा गांधी यांनाही भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती परंतु सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी महात्मा गांधी यांना भारतरत्न देण्याची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली. गांधीजींना ‘राष्ट्रपिता’ म्हटले जाते. राष्ट्रपिता हा गौरव सर्व औपचारिक नागरी सन्मानापेक्षा मोठा आहे, त्यामुळे गांधीजींना अन्य कोणताही सन्मान देण्याची गरज नाही, असे म्हणत याचिकेवर विचार करण्यास न्यायालयाने नकार दिला.
सरन्यायाधीश एस. ए. बोबडे. न्या. सूर्याकांत आणि न्या. बी. आर. गवई यांच्या खंडपीठाने याचिकाकर्ते अनिल दत्ता शर्मा यांची याचिका फेटाळून लावली आणि या बाबत केंद्र सरकारला कोणतेही निर्देश देण्याची गरज नसल्याचेही सांगितले. ‘देशातील लोकांनी महात्मा गांधी यांना राष्ट्रपिता, हा सन्मान दिला आहे. हा सन्मान कोणत्याही औपचारिक सन्मानापेक्षा मोठा आहे. आम्ही याचिकाकर्त्याच्या भावना समजू शकतो मात्र, गांधीजींना भारतरत्न देण्याची मागणी करणारी याचिका विचार योग्य नाही. तुम्ही याबाबत केंद्र सरकारशी संपर्क करण्यास आमची हरकत नाही,’ असेही खंडपीठाने म्हटले आहे.