खा. संजय राऊत यांचे वक्तव्य पक्षाचे नव्हे तर वैयक्तीक , इतिहावर बोलण्यापेक्षा देशाच्या विकासाची चर्चा महत्वाची : आदित्य ठाकरे यांची रोख ठोक प्रतिक्रिया

शिवसेनेचे खा. संजय राऊत यांचे वक्तव्य गेल्या काही दिवसांपासून गाजत असताना , त्याच्या अनुषंगाने विचारलेल्या प्रश्नावर आपली प्रतिक्रिया देताना शिवसेनेचे युवानेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ‘इतिहासावर किती दिवस बोलणार?’, असा सवाल करत त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्याबाबतचा वाद अप्रस्तुत असल्याचे सूचित केले आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत या बाबत नेमके कोणत्या संदर्भात बोलले हे आपल्याला माहीत नसून राऊत यांचे वक्तव्य वैयक्तीक आहे, ती पक्षाची भूमिका नसल्याचे आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान वाद निर्माण करण्यापेक्षा ज्या स्वातंत्र्यासाठी ते लढले तो देश विकास करतोय का याकडे लक्ष देण्याचा आवश्यकता आहे, असे सांगत या भांडणातून बाहेर पडा आणि देशाच्या विकासासाठी काम करा, असे आवाहनही आदित्य ठाकरे यांनी दिले. आदित्य ठाकरे म्हणाले कि , देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्वच नेत्यांनी योगदान दिले असून सर्वच रत्ने महान आहेत. शिवसेना आणि काँग्रेस पक्षाचं बरं चाललेलं आहे पाहून काहींच्या पोटात दुखत आहे. मात्र, शिवसेना आणि काँग्रेस पक्षाची युती कायम आहे, असे आदित्य म्हणाले.
प्रत्येकाची वेगळी मतं असतात, त्यालाच लोकशाही म्हणतात, परंतु या विषयावर वाद कशाला, इतिहासावर चर्चा व्हायला नको, सर्व नेते महान होते. सगळीच आपली दैवतं आहेत, रत्न आहेत. वाद निर्माण करण्यापेक्षा ज्या स्वातंत्र्यासाठी ते लढले तो देश विकास करतोय का याकडे लक्ष देण्याचा आवश्यकता आहे, असे सांगत या भांडणातून बाहेर पडा आणि देशाच्या विकासासाठी काम करा, असे आवाहनही आदित्य ठाकरे यांनी दिले. शिवसेनेचे खा. संजय राऊत यांनी , स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्याला विरोध करणाऱ्यांना ज्या तुरुंगात इंग्रजांनी सावरकरांना ठेवले होते, त्याच तुरुंगात पाठवायला हवे, असे वक्तव्य केले आहे. असे केल्याने विरोधकांना सावरकरांनी भोगलेल्या हालअपेष्टांची अनुभूती होईल, असेही ते पुढे म्हणाले. राऊत यांच्या अशा वक्तव्यामुळे शिवसेना आणि काँग्रेसदरम्यानचे संबंध बिघडण्याची शक्यता व्यक्त होऊ लागली आहे. विशेष म्हणजे,या पूर्वीच काँग्रेस पक्षाने स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा माफीवीर असा उल्लेख करत त्यांना भारतरत्न देण्याला विरोध दर्शवला आहे. त्यामुळे हा वाद कमी होण्याऐवजी अधिकच वाढत जाईल असे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी राऊत यांच्या वक्तव्यावर दिलेल्या प्रतिक्रियेला महत्व आले आहे.