साईबाबांच्या जन्मस्थळाचा वाद , शिर्डीकर रविवारपासून आंदोलनाच्या पवित्र्यात

साईबाबांच्या पाथरी येथील कथित जन्म स्थळाच्या वादातून शिर्डीकर आंदोलनाच्या तयारीत असून रविवारपासून शिर्डीत बेमुदत बंद पुकारण्यात आला असून शिर्डी बंदला एकूण २५ गावांनी पाठिंबा दिला आहे. या आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी आज शनिवारी ग्रामसभा बोलावण्यात आली आहे. पाथरीच्या विकासाला नव्हे तर पाथरीला साईबाबांची जन्मभूमी म्हणण्याला विरोध असल्याचं शिर्डीकरांनी स्पष्ट केलं. एकंदरीतच शिर्डी विरूद्ध पाथरी वाद चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शिर्डीकरांच्या दाव्यानुसार साईबाबांच्या जन्मस्थळाचा कोणताही अधिकृत पुरावा नसताना सरकार साईबाबांचं जन्मस्थळ म्हणुन पाथरीचा विकास करण्यावर शिर्डीकरांनी आक्षेप घेतला आहे. या सर्व प्रकाराचा निषेध करण्यासाठी शिर्डीकरांनी बंदचं हत्यार उपसण्याचा निर्णय घेतला. साईबाबांनी आयुष्यभर फकिराच्या वेशात राहुन दिनदुबळ्यांची सेवा केली. मात्र आता साईभक्तांच्या भावनेला व साईबाबांच्या विचारधारेला नख लावण्याचा प्रयत्न केला जात असल्याची भावना शिर्डीमध्ये पोहोचली आहे. त्यामुळे शिर्डी आणि पाथरीतला वाद सामोपचारानं सोडवण्याची गरज आहे.
शिर्डी बंदमुळे शिर्डीत देश आणि विदेशातून साईबाबांचे भक्त भक्तीभावानं दर्शनासाठी येत असतात. मात्र रविवारपासून भक्तांना साईबाबांचं दर्शन घेता येणार नाही. मुख्यमंत्र्यांनी मराठवाडा दौऱ्यावर असताना, साईबाबाचं जन्मस्थळ म्हणून पाथरीच्या विकास आराखड्याचं लवकरच भूमिपूजन केलं जाईल अशी घोषणा केली. त्या घोषणेनंतर शिर्डीत नाराजी पसरली. साईबाबांचा जन्म,धर्म याबाबत साईचरित्रात स्पष्ट लिहलेलं असतानाही जन्मस्थानाविषयी दावे केले जातात. हे सर्व प्रकार निंदणीय असल्याचं शिर्डीकरांचं म्हणणं आहे.