मोहन भागवत यांच्या छायाचित्रासह सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ‘भारत का नया संविधान’ वर काय आहे संघाचे म्हणणे ?

सध्या सोशल मिडीयावर सर्वत्र ‘सरसंघचालक मोहन भागवत यांच्या छायाचित्रासह ‘भारत का नया संविधान’ या नावाने एक १६ पानांची पीडीएफ व्हायरल झाली आहे. सरसंघचालक मोहन भागवत नवीन भारतीय संविधानाची निर्मिती करत असल्याचा खोटा प्रचार याद्वारे केला जात आहे. हा संघ व सरसंघचालकांच्या बदनामीचा कट आहे. यातून समाजात अस्थीरतेचे वातावरण निर्माण करण्याचा हा प्रकार आहे, अशा आशयाची तक्रार राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे करण्यात आली आहे. या प्रकरणातील आरोपींना शोधून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी’, अशी मागणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विदर्भ प्रांत सहसंघचालक श्रीधर गाडगे यांनी पत्रपरिषदेत केली.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या कथित संविधान यासंदर्भात रा. स्व. संघाने कोतवाली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर संघाच्या विरोधात बदनामी करण्यासाठी वेगवेगळे संदेश प्रसारित केले जात आहेत. ‘नया भारतीय संविधान’ असे १६ पाने असलेली एक फाइल तयार करून ती व्हॉट्सअॅपवर प्रसारित केली जात आहे. त्यातून संघाची व सरसंघचालक मोहन भागवत यांची बदनामी केली जात आहे. हा मजकूर मानहानीकारक, धमकविणारा व खोटा आहे. सोशल मीडियावर त्याचा प्रसार केला तर देशामध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. कोणीतरी हेतुपुरस्सर, जाणीवपूर्वक व विशिष्ट समाजातील भावना दुखावण्याचा प्रयत्न या माध्यमातून करीत आहे. त्यामुळे हा संदेश पसरविणाऱ्याचा शोध घेऊन त्याच्यावर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
संघाने म्हटले आहे कि , संविधान बदलण्याबाबत संघाने कधीही भूमिका घेतली नाही. सर्व जाती, धर्म आणि पंथांचा विचार संघ करीत असून, विविध माध्यमांतून संघाच्यावतीने सेवाकार्य सुरू आहे. या पीडीएफ फाइलच्या मुखपृष्ठावर सरसंघचालकांचे छायाचित्र वापरणे, हा सरसंघचालकांच्या बदनामीचा प्रकार असून दिल्ली, लखनौ याठिकाणच्या पोलिस ठाण्यांतही अशा आशयाच्या तक्रार करण्यात आल्या आहेत. त्यानंतर संघाने नागपुरात कोतवाली पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे. या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेला विदर्भ प्रांत संघचालक राम हरकरे, महानगर संघचालक राजेश लोया, अतुल मोघे, रवींद्र बोकारे आदी संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.