प्रजासत्ताक दिनापासून मुंबईत आता प्रायोगिक तत्वावर ” नाईट लाईफ ” ला मंजुरी !!

पुढच्या आठवड्यात म्हणजे प्रजासत्ताक दिनी २६ जानेवारीपासून मुंबईत प्रायोगिक तत्त्वावर “नाईट लाईफ” सुरु होणार आहे. लोकभाषेत सांगायचे तर मुंबईत आता ” रात्रीस खेळ चालणार आहे !!” नुकत्याच झालेल्या एका विशेष बैठकीत “नाईट लाईफ” च्या या नव्या खेळाला मंजुरी देण्यात आली आहे. या खेळात आता मुंबईतील हॉटेल्स, मॉल्स २४ तास सुरु राहू शकतात. अर्थात हि कोणत्याही व्यावसायिकांवर सक्ती नाही पण ज्यांची इच्छा असेल ते या २४ तासाच्या खेळात सहभागी होऊ शकतात. नव्या नियमानुसार, आठवड्याभरात आस्थापन कोणत्या दिवशी बंद ठेवायचे, याचा निर्णय व्यावसायिकांचा असणार आहे. मद्यविक्री करणारी दुकाने व आस्थापने रात्री १.३० वाजेपर्यंतच खुली असतील.
आदित्य ठाकरे यांचं हे स्वप्न होतं असं सांगण्यात येत आहे. ही संकल्पना त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा मांडली होती. त्यानुसार आता त्यांच्या स्वप्नपूर्तीच्या दृष्टीने हे पहिलं पाऊल पडलं आहे असं म्हटलं जात आहे. भाजपा आणि शिवसेना युतीचं सरकार होतं तेव्हाच ही संकल्पना आताचे महाविकास आघाडीतील युवा कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांनी मांडली होती. मात्र फडणवीस सरकारच्या काळात त्यांची हि संकल्पना वास्तवात येऊ शकली नाही. आता “आपलं सरकार” आल्यानंतर प्रायोगिक तत्त्वार का होईना पण त्यांचा हट्ट पूर्ण झाला आहे. सगळं काही ठीक चाललं तर मग पुढे इतर शहरातही या खेळाचे प्रयोग सरकार सुरु करील असे सांगण्यात येत आहे. अर्थात पर्यावरण व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनीच हा निर्णय घेतला आहे.
सह्याद्री अतिथी गृहात गुरूवारी या प्रयोगाबाबत माॅल मालक, हाॅटेल मालक, ज्येष्ठ नागरिक, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, पोलिस आयुक्त संजय बर्वे, पालिका आयुक्त प्रवीण परदेशी व सरकारी अधिकारी यांची बैठक झाली. त्यात आदित्य ठाकरे यांनी “नाइट लाइफ”चा निर्णय घेतला. शुक्रवारी पालिकेच्या वरळी येथील घनकचरा विभागाच्या प्रदर्शनात पत्रकारांनी नाइट लाइफच्या निर्णयाबाबत माहिती विचारली असता, आदित्य ठाकरे यांनी २६ जानेवारीपासून नाइट लाइफ अंमलबजावणीची माहिती दिली.
पर्यावरण आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या मते , ही योजना प्रायोगित तत्त्वावर राबवली जाणार असून मॉल्स, मल्टिप्लेक्स, दुकाने आणि हॉटेल्स दिवस-रात्र सुरू राहिल्याने राज्याला अधिक महसूल प्राप्त होईल. रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील. मुंबईत २५ मोठे मॉल, शेकडो हॉटेल्स आणि व्यावसायिक आस्थापने आहेत. ही आस्थापने २४ तास आपली दुकाने सुरू ठेऊ शकतात मात्र हा निर्णय पूर्णपणे व्यापाऱ्यांवर अवलंबून असेल. २४ तास दुकाने सुरू ठेवण्यासंदर्भात प्रशासनाकडून कोणताही दबाव आणला जाणार नाही, असे मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी यांनी स्पष्ट केले.
दरम्यान भाजपने याबाबत सावध प्रतिक्रिया दिली आहे . भाजपचे आमदार अॅड. आशिष शेलार यांनी यासंदर्भात ट्विट करताना म्हटले आहे कि , मुंबईत हाँटेल, बार, पब २४ तास सुरू ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतल्याचे समजले. त्याबाबत नियम, नियमावली काय आहे ही प्रसिद्ध व्हायची आहे. ती झाल्यावर सविस्तर बोलूच. पण निवासी भागात हॉटेल,पब २४ तास सुरू ठेवून सामान्य नागरिकांची शांतता भंग होणार असेल तर आमचा कडाडून विरोध राहील.