चर्चेतली बातमी : भिडेंच्या सांगली बंदवरून सुप्रिया सुळे यांची टीका , ” हा बंद म्हणजे राजकीय षडयंत्र !!”

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संभाजी भिडे यांच्या ‘शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान’ संघटनेनं आज पुकारलेल्या सांगली बंदला विरोध दर्शवला असून ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगली दौऱ्यावर असताना पुकारण्यात आलेला हा बंद म्हणजे राजकीय षडयंत्र आहे,’ असा थेट आरोप सुळे यांनी केला आहे. ‘ज्या शिवछत्रपतींनी आपल्याला कष्ट करायला शिकवलं. त्यांच्या नावाचा वापर करून बंद करणं मला अयोग्य वाटतं,’ असं त्यांनी भिडे यांचे नाव न घेता आपली तीव्र प्रतिक्रिया दिली.
शिवसेनेचे खा. संजय राऊत यांनी ‘आज के शिवाजी: नरेंद्र मोदी’ पुस्तकाबद्दल भाजपमध्ये असलेल्या शिवरायांच्या वंशजांनी भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी केली होती. त्यावर पक्षाचं नाव शिवसेना ठेवताना वंशजांना विचारलं होतं का, असं उदयनराजे यांनी म्हटलं होतं. त्याला उत्तर देताना राऊत यांनी उदयनराजेंकडून वंशज असल्याचे पुरावे मागितले होते. त्यांच्या या वक्तव्यामुळं राजकारण तापलं आहे. राऊत यांच्या वक्तव्याचा निषेध म्हणून साताऱ्यानंतर आज सांगलीत बंद पुकारण्यात आला आहे.
दरम्यान ‘छत्रपती परंपरा ही हिंदुस्थानची प्राणभूत परंपरा आहे. या परंपरेचा वा वंशजांचा अवमान म्हणजे देशाचा अवमान आहे. त्यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना पदावरून हाकला,’ अशी मागणी शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी केली आहे. राऊत यांच्या वक्तव्याचा निषेध म्हणून साताऱ्यानंतर आज सांगलीत बंद पुकारण्यात आला आहे. भिडे यांच्या ‘शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान’ या संघटनेनं या बंदची हाक दिली आहे.