ब्रिटनची राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या न्यायमंत्रालयात हरीश साळवे यांची नियुक्ती , महाराष्ट्राचा बहुमान

भारताचे सुप्रसिद्ध आतंरराष्ट्रीय वकील हरीश साळवे यांची ब्रिटनची राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या न्यायमंत्रालयात काऊंसिल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भारतासाठी त्यातही मराठी माणसांसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. ब्रिटिश सरकारने प्रसिद्ध केलेल्या प्रेस नोटनुसार महाराणीने आपल्या न्यायमंत्रालयात ११४ वकिलांची ‘क्वीन काऊंसिल’ म्हणून नियुक्ती केली आहे. वकिली क्षेत्रात चांगली कामगिरी करणाऱ्यांना ही उपाधी दिली जाते.
कॉग्रेसचे नेते एन.के.पी.साळवे यांचे सुपुत्र असलेले हरीश साळवे यांचे नाव केवळ देशातच नाही तर जगातील सर्वात मोठ्या वकिलांमध्ये घेतले जाते. आतंरराष्ट्रीय न्यायालयात गेल्या वर्षी त्यांनी कुठलेही मानधन न घेता कुलभूषण जाधव यांचा खटला चालविला होता. काही अहवालांनुसार त्यांचे एका दिवसाचे कामाचे शुल्क हे ३० लाखांच्या घरात आहे. त्याआधी सलमान खान, मुकेश अंबानी, इटली सरकार आणि वोडाफोन सारख्या क्षेत्रातील बड्या लोकांसाठी काम केले आहे. धुळे जिल्ह्यातील वरुड गावाता जन्म झालेल्या हरीश साळवे यांनी नागपूर विद्यापीठातून एलएलबीचे शिक्षण घेतले. साधारण १९८० मध्ये त्यांनी वकिलीला सुरुवात केली. १९९२ या वर्षात हरीश साळवे यांची दिल्ली उच्च न्यायालयात ज्येष्ठ वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली. १९९९ ते २००२ पर्यंत ते देशाला सॉलिसिटर जनरल म्हणून काम पाहत होते. हरीश साळवे यांचे आजोबा पी.के.साळवे प्रसिद्ध क्रिमिनल लॉयर होते. तर पणजोबा हे न्यायाधीश होते.